नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत हे आऊट झाले आहेत. आज त्यांनी दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेतल्यानंतर या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं. पण या निवडणुकीच्या निमित्तानं जे महाभारत पक्षात घडलंय, त्याचा परिणाम पक्षावर नक्की होणार आहे.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी ज्यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होती, ते अशोक गहलोत या स्पर्धेतून नाट्यमयरित्या बाद झाले आहेत. रविवारी राजस्थानमध्ये आमदारांच्या बैठकीत जे घडलं त्यानंतर याची कुणकुण होतीच. पण आज दिल्लीत सोनिया गांधींच्या भेटीनंतर यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालं. राजस्थानमध्ये जे घडलं त्याबद्दल आपण सोनिया गांधींची माफी मागितली हे सांगतानाच गहलोतांनी आपण आता अध्यक्षपदाचा अर्ज भरणार नसल्याचंही सांगून टाकलं. त्यामुळे आता अध्यक्षपदासाठी अजून एखादा नवा उमेदवार रिंगणात येतो का हेही पाहावं लागेल.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरायला आता केवळ 24 तास उरलेत. उद्याचा शुक्रवारचा दिवस अंतिम दिवस आहे. पण अध्यक्षपदासाठी उमेदवारांचा घोळ अजूनही सुरु आहे. आतापर्यत शशी थरुर आणि दिग्विजय सिंह हे दोघेच अर्ज घेऊन गेलेत. पण अर्ज मात्र अजून एकाही उमेदवारानं भरलेला नाही.
अध्यक्षपदासाठी निवड करतानाच काँग्रेसला राजस्थानचं सत्तासमीकरण पण व्यवस्थित सांभाळणं आवश्यक होतं. पण जो ड्रामा झाला त्यात पक्षाच्या अंतर्गत शिस्तीचे वाभाडे निघाले आहेत.
तब्बल 130 वर्षे जुना पक्ष एक अध्यक्ष निवडताना मेटाकुटीला आल्याचं दिसून येतंय. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो ड्रामा सुरु आहे त्यामुळे काँग्रेसचं हायकमांड कधी नव्हे इतकं दुबळं बनल्याचा संदेश गेला. देशात केवळ दोन राज्यांत काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत, त्यात एक राजस्थान. पण आहे ती राज्यं टिकवणंही अशा बेशिस्तीमुळे काँग्रेसला अवघड होऊन बसेल. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गहलोतांच्या रुपानं एक ओबीसी चेहरा समोर येत होता, पण आता दिग्विजय सिंह यांच्यासारख्या राजघराण्यातल्या व्यक्तीलाच अभिषेक करण्याची वेळ पक्षावर येऊ शकते. दिग्विजय सिंह यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे काँग्रेस अनेकदा अडचणीत आली आहे. त्यामुळे त्यांच्या अध्यक्षपदानं भाजपला आयता फुलटॉसच मिळण्याची शक्यता अधिक आहे.
दुसरीकडे राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाचं काय होतं, पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांपर्यंत आता गहलोतच कायम राहतात का हेही पाहावं लागेल. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी जो आदेश द्याल तो शिरसावंद्य असेल असंही आपण सोनिया गांधींना सांगितल्याचं गहलोत म्हणाले आहेत.
तिकडे दिग्विजय सिंह आणि शशी थरुर या दोन नेत्यांनी आज एकमेकांची भेट घेतली. दोघेही अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. गहलोत आऊट झाल्यानंतर आता या स्पर्धेत कुणाचा नंबर लागतोय. हे लवकरच कळेल.
एकतर गेल्या तीन वर्षांपासून काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष नाही. त्यात इतक्या वेळा पुढे गेलेली अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर गेली आणि आता शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारीवरुन गोंधळ सुरु असल्याचं दिसून येतंय. 2024 च्या दृष्टीनं मोदींना टक्कर देणारा पक्ष उभा करण्याची जबाबदारी असताना हा गोंधळ त्यात कसा उपयोगी ठरणार हा प्रश्नच आहे.