पणजी : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेतली. विधानसभेत जाऊन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या तब्येतीची विचारपूस करत लवकर बरे व्हा, अशी सदिच्छा व्यक्त केली. राहुल गांधी गेले दोन दिवस विश्रांतीसाठी गोव्यातच आहेत.


गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झालं. गंभीर आजारी असूनही मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर या अधिवेशनाला उपस्थित असल्याने सगळ्यांचे लक्ष त्यांच्याकडे होतं. यामध्ये गोव्यात सुट्टीवर आलेले राहुल गांधीही त्याला अपवाद ठरले नाहीत.

राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विधानसभेचे कामकाज संपताच विधानसभेच्या मागील बाजूने राहुल गांधी आत आले. त्यांनी पहिल्या मजल्यावरील मुख्यमंत्र्यांच्या चेंबरमध्ये जाऊन मनोहर पर्रिकर यांच्या तब्येतीची आस्थेने चौकशी करत लवकर बरे व्हा, अशी सदिच्छा व्यक्त केली.

मुख्यमंत्री कार्यालयाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांची भेट सदिच्छा होती. तब्येत इतकी खालावली असतानाही तुम्ही हे सगळे कसे करता असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला. त्यावर पर्रिकर यांनी आपला हा स्वभाव असून आपण जे ठरवतो ते करतो, त्यामुळे आपल्याला त्याची सवय झाली असल्याचं सांगितलं.

राहुल यांनी आपल्या आईच्या वतीने पर्रिकर यांना शुभेच्छा देताना, दिल्लीमधील प्रदूषणाला कंटाळून आपण हवापालट करण्यासाठी गोव्यात अधूनमधून येत असल्याचं सांगितलं.
मुख्यमंत्री पर्रिकर यांची भेट घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या विनंतीला मान देऊन विरोधी पक्षाच्या दालनात जाऊन काँग्रेस आमदारांची भेट घेतली. पुढच्या महिन्यात राजकीय भेटीवर गोव्यात येणार असल्याचं त्यांनी काँग्रेस आमदारांना सांगितलें.

कालच राहुल गांधी यांनी राफेल ऑडिओ क्लिपवर अद्याप कोणतीच करवाई झाली नसल्याने त्या क्लिपमधील माहिती खरी आहे, असं म्हणायला वाव असल्याचं ट्वीट करत मुख्यमंत्री पर्रिकर यांना चिमटा काढला होता.