नवी दिल्ली : राहुल गांधींनंतर काँग्रेसचा अध्यक्ष कोण या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आता काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. सर्वसहमतीने नाव शोधण्यात अपयश आल्याने पक्षाला हाच मार्ग उपलब्ध असल्याचं दिसतंय. या निवडणुकीत गांधी परिवारातला कुठला सदस्य सहभागी होणार नाही असंही कळतंय.


राहुल गांधींनंतर कोण? याचा फैसला आता निवडणुकीनेच करण्याची वेळ काँग्रेसवर येऊ शकते. गेल्या पन्नास दिवसांपासून हा घोळ सुरु आहे, कुठल्या एका नावावर सहमती होताना दिसत नाही. अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत गांधी कुटुंब कुठल्याही पद्धतीनं सहभागी व्हायला तयार नाही, त्यामुळेच ही प्रक्रिया पुढे जात नाही. अशा स्थितीत निवडणूक हाच योग्य पर्याय असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.

राहुल गांधींचा राजीनामा स्वीकारणं, नव्या अध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया हे सगळं ज्या काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत आहे, ती बैठक गेल्या महिनाभरापासून बोलावलीच जात नाहीये. कधी कर्नाटकच्या घोळाचं कारण, तर कधी संसदेचं अधिवेशन सुरु असल्याचं कारण... आता 22 जुलैपर्यंत ही बैठक पुढे ढकलली गेल्याचं सांगितलं जातंय.

अध्यक्षपदाची निवडणूक कशी, कधी असणार याचा आराखडा वर्किंग कमिटीच्या बैठकीतच ठरणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ही प्रक्रिया महाराष्ट्र, झारखंड, हरियाणाच्या निवडणुकीनंतरही होऊ शकते. तोपर्यंत या संदर्भातलं कामकाज पाहण्यासाठी एका ज्येष्ठ महासचिवाची नियुक्ती बैठकीत होऊ शकते.

पन्नास दिवस झाल्यानंतर काहींनी दबक्या आवाजात प्रियंका गांधी यांचंही नाव पुढे करायला सुरुवात केली. पण राहुल गांधी यांनी राजीनामा देतानाच मी राजीनामा देतोय म्हटल्यावर लगेच प्रियंकाचं नाव सुचवू नका असं म्हटलं होतं. गांधी कुटुंबातला कुठलाही सदस्य त्यामुळे यावेळी अध्यक्षपदाच्या रिंगणात नसेल असं म्हटलं जातंय. सीताराम केसरींच्या काळात अध्यक्षपदाची जी निवडणूक झाली होती त्याची यानिमित्तानं आठवण होणं साहिजक आहे.

निवडणुकीने अध्यक्षपदाची निवड होते तेव्हा गटबाजीचाही धोका असतो. त्यातच सध्या काँग्रेस इतकी दुबळी झालीय, की उघडपणे अशी लढाई झाल्यास त्याचा पक्षाला फटका बसू शकेल अशी काहींची चिंता आहे. गांधी परिवाराने 20 वर्षे काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद सांभाळल्यानंतर आता ते गांधी घराण्याबाहेर जाणार आहे. हे स्थित्यंतर सफाईदारपणे होतं की आधीच उद्धवस्त झालेल्या पक्षाला या प्रक्रियेत आणखी तडे बसतात हे पाहावं लागेल.