नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार आहे. अध्यपदाच्या निवडीसाठी आज अधिसूचना जारी केली जाईल. तसंच इच्छूक आज आपला उमेदवारी अर्ज भरु शकतात.


उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख 4 डिसेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. तर 5 डिसेंबरला अर्जांची छाननी करुन दुपारी 3.30 वाजेपर्यंत वैध अर्जांची यादी जाहीर करण्यात येईल.

मात्र पक्षाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी एकमेव उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे याच दिवशी म्हणजेच 5 डिसेंबरला राहुल गांधींची काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून घोषणा होऊ शकते. अशाप्रकारे 9 आणि 14 डिसेंबरला दोन टप्प्यात होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीआधी राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष बनण्याची शक्यता आहे.

मात्र काँग्रेसच्या निवडणूक कार्यक्रमानुसार, पक्षाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 11 डिसेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर दुपारी 4 वाजेपर्यंत अंतिम यादी जाहीर करण्यात येईल. आवश्यक असल्यास 16 डिसेंबरला मतदानही होईल. जर मतदान झालं तर मतमोजणीनंतर 19 डिसेंबर रोजी निकालाची घोषणा होईल.

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया

अर्ज भरण्याची तारीख - 4 डिसेंबर

अर्जांची छाननी - 5 डिसेंबर

अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख - 11 डिसेंबर

मतदानाची तारीख (गरज असल्यास) - 16 डिसेंबर

मतदानाचा निकाल - 19 डिसेंबर