Congress New President: काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, खासदार मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) विजयी झाले आहेत. खर्गे यांनी शशी थरुर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे. याबाबतची औपचारिक घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर यांनी खर्गे यांचे अभिनंदन केले आहे. खर्गे यांना 7897 मते मिळाली. तर थरूर यांच्या पारड्यात 1072 मते आली. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 9385 जणांनी मतदान केले होते. 


जवळपास 25 वर्षांनंतर काँग्रेस पक्षात अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. त्याशिवाय, यंदा 25 वर्षानंतर गांधी कुटुंबीयाबाहेरील व्यक्ती काँग्रेस अध्यक्षपदी असणार आहे.  काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडले होते. विद्यमान अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत जवळपास 95 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. 


खर्गे यांच्या समोर आव्हान 


काँग्रेसचे नवीन अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासमोर पक्षाला उभारी देण्याचे मोठे आव्हान असणार आहे. आपल्या राजकीय अस्तित्वासाठी काँग्रेसला संघर्ष करावा लागत आहे. राजस्थान आणि छत्तीसगड वगळता इतर मोठ्या राज्यात स्वबळावर सत्ता नाही. त्यामुळे काँग्रेसला नवचैतन्य देण्याचे आव्हान खर्गे यांच्यासमोर असणार आहे. हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणूक आता मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कामगिरीकडे अनेकांचे लक्ष असणार आहे. दोन वर्षानंतर देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने खर्गे यांना पक्षाची नव्याने बांधणी करावी लागणार आहे. भाजपविरोधात विरोधकांना एकत्र आणणे आणि त्यांची मोट बांधण्याची जबाबदारी खर्गे यांच्या खांद्यावर असणार आहे. 


काँग्रेस अध्यक्षपदासाठी अखेरची निवडणूक 2000 मध्ये पार पडली होती. सोनिया गांधी आणि जितेंद्र प्रसाद यांच्यामध्ये लढत झाली होती. या निवडणुकीत प्रसाद यांचा दारुण पराभव झाला होता. त्याआधी 1997 मध्ये शरद पवार, सीताराम केसरी आणि राजेश पायलट यांच्यामध्ये काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली होती. सीताराम केसरी यांचा विजय झाला होता. शरद पवारांना पराभवाचा धक्का बसला होता.