नवी दिल्ली: काँग्रेसच्या तीन दिवसीय अधिवेशनाला आजपासून दिल्लीत सुरुवात होणार आहे. पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतर राहुल गांधींचं हे पहिलंच अधिवशेन आहे. त्यामुळं त्यांच्या भाषणाकडे साऱ्यांचं लक्ष असेल.
दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियममध्ये या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलंय. या अधिवेशनात उद्या राहुल गांधींचं भाषण होणार आहे.
या तीन दिवसात येत्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला बळकटी देण्याचं काम केलं जाणार आहे. देशभरातून तब्बल 12 हजार कार्यकर्ते या अधिवेशनात सहभागी होणार असल्याची माहिती मिळतीय..
येत्या काही दिवसात कर्नाटक विधानसभा निवडणुका आहेत. त्यापाठोपाठ राज्यस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्येही विधानसभेचा आखाडा तापणार आहे. त्यामुळे यात काँग्रेस काय रणनीती ठरवते हे पाहणं महत्वाचं आहे.
राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला. त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास उंचावला आहे. सर्व मोदी विरोधकांना एकत्र करुन मोट बांधण्याचे प्रयत्नही सुरु झालेत. त्यावरही अधिवेशनात चर्चा होऊ शकते.