नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. या पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. शनिवारी नवी दिल्ली येथे झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल यांनी हाच मुद्दा उपस्थित केला. परंतु काँग्रेस कार्यकारिणीने राहुल यांना राजीनामा न देण्याचा सल्ला दिला. याबाबत बोलताना माजी वित्त मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम म्हणाले की, राहुल यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊ नये. तसे केल्यास दक्षिण भारतातील काँग्रेस कार्यकर्ते आत्महत्या करतील.


काल झालेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत सर्व काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. त्यांच्या राजीनाम्याला जोरदार विरोधही केला. राहुल यांनी अध्यक्षपदावर कायम रहावे, अशी विनंतीदेखील केली.

नेत्यांच्या विरोधानंतरही राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. राहुल गांधी आपला निर्णय मागे घेतील याची शक्यता फारच कमी आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी घराण्यापलीकडचा माणूस हवा. मी काँग्रेससाठी सैनिकासारखं, एखाद्या कार्यकर्त्याप्रमाणे काम करत राहीन, असे वक्तव्यही राहुल गांधींनी बैठकीत केल्याचे समोर आले आहे.

अध्यक्षपदासाठी गांधी घराण्याशिवाय इतर नेत्यांचा विचार करा, राहुल गांधींचा प्रस्ताव | ABP Majha



राहुल गांधींच्या नेतृत्वावर सर्वांनी विश्वास दाखवला असला तरी त्यांच्या ऑफिसच्या कार्यशैलीबाबत मात्र काहींनी नाराजी व्यक्त केली. निखिल अल्वा, के. राजू, संदीप सिंह यांच्यासारखे राहुल यांचे अनेक सहकारी हे डाव्यांच्या प्रभावाखाली आहेत. त्यामुळे पक्षाची दिशा चुकत असल्याचा अनेकांचा आरोप होता.

काँग्रेस वर्किंग कमिटीच्या या बैठकीत जे लोक चिंतनासाठी बसले होते, त्यापैकी अनेकांना पराभवाचा झटका बसला आहे. राहुल गांधी स्वतः अमेठीतून हरले आहेत. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गेदेखील हरले आहेत. ज्योतिरादित्य शिंदे, आरपीएन सिंह, सुषमासिंह देव हे सर्व काँग्रेसचे बडे नेतेदेखील पराभूत झाले आहेत. त्यामुळे सीडब्लूसीत कोण कोणाकडे बोट दाखवणार हा प्रश्न होताच. आता या मंथनातून काँग्रेस पक्ष खरंच काही क्रांतिकारी बदल करणार का? की पुन्हा ये रे माझ्या मागल्या असेच पाहायला मिळणार, हे लवकरच कळेल.

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या पुत्रप्रेमावर राहुल गांधींचा राग | नवी दिल्ली | एबीपी माझा



दरम्यान, निवडणुकीतील पराभवानंतर गांधी कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीने राजीनामा सादर करायचा, आणि त्यानंतर काँग्रेस वर्किंग कमिटीने तो नाकारायचा, असे नाट्य याहीआधी घडलेले आहे. त्यामुळे आज त्याचीच पुनरावृत्ती पाहायला मिळाली. सलग दोन मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेस पक्ष आता स्वतःच्या कार्यशैलीबद्दल गांभीर्याने विचार करणार का? नव्या पुनर्ररचनेत राहुल गांधी काही धाडसी निर्णय घेणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे.