Congress National President : राजस्थानमध्ये (Rajasthan) मोठा राजकीय भूकंप (Rajasthan Political Crisis) आल्याचं बोललं जात आहे. एकीकडे काँग्रेस अध्यक्षपदासाठी (Congress National President) उमेदवारी दाखल करण्यासाठी सुरुवात झाली असून दुसरीकडे राजस्थानमधील राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं जाहिर केलं होतं. त्यानंतर पक्षनेतृत्वाने मोठी जबाबदारी दिल्यास गेहलोत यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दर्शवली होती. मात्र गेहलोत समर्थकांनी राजीनाम्याला विरोध केला आहे. गेहलोत समर्थकांच्या मते अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी हा प्रयत्न आहे. गेहलोत समर्थकांनी सचिन पायलट यांच्याकडे मुख्यमंत्री पद सोपवण्यास विरोध दर्शवला.


दिग्विजय सिंह उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता


दरम्यान राजस्थानमधील राजकीय वातावरण तापलेलं असताना दिग्विजय सिंह यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे संकेत दिले आहेत. राजस्थानमध्ये अस्थिरता असताना दिग्विजय सिंह यांचे हे वक्तव्य आले आहे. राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय नाट्यामुळे अशोक गेहलोत हे काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत आता मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खरगे, दिग्विजय सिंह, केसी वेणुगोपाल हे काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत.


काँग्रेसमध्ये पुन्हा फूट पडणार?


राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्या समर्थकांनी बंडाचा हा बिगुल वाजवला आहे. अशोक गेहलोत काँग्रेस अध्यध्यक्षपदाची निवडणूक लढवणार होते आणि सचिन पायलट यांना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात येणार होती. पण गेहलोत यांच्या समर्थकांनी याला विरोध केला आहे. दरम्यान, हे सर्व गेहलोत यांच्या सांगण्यावरून घडलं असे मानलं जात आहे. पण हे प्रकरण गेहलोत यांच्यावर उलटू शकतं, असंही बोललं जात आहे. राजस्थानमधील परिस्थितीमुळे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी प्रचंड नाराज असल्याचे मानले जात आहे. राजस्थान काँग्रेसमधील राजकीय भूकंप पाहता मल्लिकार्जुन खरगे आणि अजय माकन यांना पक्षाने पर्यवेक्षक म्हणून राजस्थानमध्ये पाठवले. मल्लिकार्जुन खरगे आणि अजय माकन आज जयपूरहून परतून सोनिया गांधी यांना अहवाल देतील. त्यानंतर लवकरच निर्णय होईल आणि त्याचा परिणाम काँग्रेस पुन्हा एकदा फुटीच्या रूपाने समोर येऊ शकतो.


राजस्थानमधील परिस्थितीबाबत जयपूरहून परतलेले निरीक्षक मल्लिकार्जुन खरगे आणि अजय माकन आज आपला अहवाल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सादर करणार आहेत. त्याचवेळी, काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नामांकनाच्या शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजेच 30 सप्टेंबरपर्यंत ही स्थिती कायम राहील, त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्याची शक्यता नाही, 30 सप्टेंबरनंतर काँग्रेस नेतृत्व पुढील निर्णय घेईल. गेहलोत यांच्या पक्षात झालेली ही जमवाजमव त्यांना पक्षाध्यक्ष बनवण्याच्या शक्यतेमुळे झाल्याचे काँग्रेस सूत्रांचे मत आहे.