इटानगर: अरुणाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठे भगदाड पडलं आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि त्यांच्या 42 समर्थक आमदारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल या पक्षात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री नबाम तुकी यांचा अपवाद वगळता उर्वरित सर्वच आमदारांनी पक्षांतर केल्याने काँग्रेसमधील पक्षांतर्गत कलह समोर आले आहे.


अरुणाचल प्रदेश विधानसभेत 60 जागा असून यातील 44 जागांवर काँग्रेसचे आमदार होते. मात्र शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री पेमा खांडू, उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री चोवना मेन यांच्यासह 42 आमदारांनी पीपीएमध्ये प्रवेश केला.

पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल हा पक्ष भाजपप्रणित पूर्वोत्तर विकास आघाडीतील घटक पक्ष आहे. मे 2016 मध्ये भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी या आघाडीची स्थापना केली होती. 25 खासदार देणाऱ्या पूर्वोत्तर राज्यांवरील पकड मजबूत करण्यासाठी भाजपने प्रादेशिक पक्षांशी हातमिळवणी करुन या आघाडीची स्थापना केली होती.