Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना संसर्गात हळूहळू घट होताना दिसत आहे. आधीच्या दिवसाच्या तुलनेत आज नवीन कोरोनाबाधितांमध्ये काहीशी घट झाली आहे. गेल्या 24 तासांत 2 हजार 685 नवीन रुग्ण कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 33 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 16 हजारांवर पोहोचली आहे.
देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 16 हजारांवर
देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 158 कोरोना रुग्ण संसर्गातून बरे झाले आहेत. यासह आतापर्यंत देशात कोरोना विषाणूच्या संसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 4 कोटी 26 लाख 9 हजार 335 इतकी झाली आहे. देशात सध्या सक्रिय रुग्णांचा दर 0.04 टक्के झाला आहे. देशातील सध्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 16 हजार 308 एवढी पोहोचली आहे. देशात आतापर्यंत 84 कोटीहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशात गेल्या 24 तासांत चार लाख 47 हजार 637 नमुने तपासण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात सर्वाधिक नवे रुग्ण
सर्वात जास्त नवे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. राज्यात गेल्या 24 तासांत 536 नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्या मागोमाग राजधानी दिल्लीत 445 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. पश्चिम बंगालमध्ये 22 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे पाच लाखांहून अधिक जणांनी प्राण गमावले आहेत. गेल्या 24 तासांत 33 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोना माहामारी सुरु झाल्यास आतापर्यंत 5 लाख 24 हजार 572 जणांनी कोरोना विषाणूमुळे आपला जीव गमावला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या