नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री एस. एम. कृष्णा यांनी काँग्रेसला रामराम केल्यानंतर भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. 1971 पासून म्हणजे गेली 36 वर्ष एस एम कृष्णा हे काँग्रेसमध्ये होते.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि अनंत कुमार यांच्या उपस्थितीमध्ये एस एम कृष्णा यांनी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला. 29 जानेवारीला त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. कर्नाटकातील मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्या कारभारावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
84 वर्षीय कृष्णा 1999 ते 2004 या काळात काँग्रेसतर्फे कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून काम पाहिलं. याशिवाय यूपीए सरकारमध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्रिपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती.