Agnipath Scheme : गेल्या दोन-तीन दिवसांपासून केंद्राच्या अग्निपथ योजनेवरून देशभरात आंदोलने सुरू आहेत. आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी यावरून पंतप्रधान नरेंद्र ( pm modi ) मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नरेंद्र मोदी यांना ज्या प्रकारे वादग्रस्त कृषी कायदे मागे घ्यावे लागले, त्याच पद्धतीने त्यांना 'अग्निपथ' योजना मागे घ्यावी लागेल. भारतीय जनता पक्षाचे (BJP) सरकार आठ वर्षांपासून 'जय जवान, जय किसान'च्या मूल्यांचा अवमान करत आहे, अशी टीका राहुल गांधी केली आहे.
राहुल गांधी यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "आठ वर्षांपासून भाजप सरकारने 'जय जवान, जय किसान'च्या मूल्यांचा अवमान केला आहे. पंतप्रधानांना काळे कृषी कायदे मागे घ्यावे लागतील, असे मी यापूर्वीही म्हटले होते. त्याचप्रमाणे त्यांना 'माफिवीर' बनून देशातील तरुणाईची आज्ञा पाळावी लागेल आणि 'अग्निपथ' योजना परत घ्यावी लागेल.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी देखील अग्निपथ योजनेवरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. आणि सशस्त्र दलात भरतीसाठी तयारी करणाऱ्या ग्रामीण तरुणांच्या वेदना समजून घेण्याची विनंती केंद्राला केली. अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ अनेक राज्यांमध्ये महामार्ग आणि रेल्वे स्थानकांवर हिंसाचार झाला आहे. यादरम्यान, तेलंगणातील सिकंदराबाद येथे पोलिसांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला, तर काही शहरांमध्ये गाड्यांची जाळपोळ आणि खासगी व सार्वजनिक वाहनांची तोडफोड झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
प्रियांका गांधी म्हणाल्, "सैन्यात भरतीची तयारी करणाऱ्या ग्रामीण तरुणांच्या वेदना समजून घ्या. तीन वर्षांपासून नोकरभरती झाली नाही. तरुणांच्या पायाला फोड आले होते. त्यांची निराशा झाली आहे. वायुसेनेतील भरती आणि भरतीच्या निकालाची तरुणांना प्रतीक्षा होती. सरकारने त्यांची कायमची भरती, रँक, पेन्शन काढून घेतली, नोकरभरती बंद केली.
प्रियांका गांधी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना सशस्त्र दलातील भरतीतील विलंबाबाबत लिहिलेल्या पत्राची प्रतही शेअर केली आहे. या पत्राद्वारे त्यांनी सिंह यांना सैन्यात भरती होण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांच्या मेहनतीचा आदर केला जावा यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची विनंती केली.
प्रियांका गांधी यांनी 29 मार्च रोजी लिहिलेल्या पत्राद्वारे सशस्त्र दलात भरतीबाबत तरुणांना भेडसावणाऱ्या समस्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. मंगळवारी ही योजना सुरू करताना सरकारने सांगितले होते की, साडेसतरा ते 21 वर्षे वयोगटातील तरुणांची लष्कर, हवाई दल आणि नौदलात चार वर्षांच्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली जाईल. सरकारने सांगितले होते की, 25 टक्के जवानांना संरक्षणाच्या गरजेनुसार नियमित सेवेसाठी कायम केले जाईल. 'अग्निपथ' योजनेला होत असलेला वाढता विरोध पाहता गुरुवारी भरतीसाठी वयोमर्यादा 23 वर्षे करण्यात आली.