Kamal Nath Joined BJP: काँग्रेसला (Congress) रामराम ठोकणाऱ्या नेत्यांची यादी मोठी होत चालली आहे. यामध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातून अशोक चव्हाण (Ashok Chavan join Bjp) यांनी काँग्रेसला (BJP) रामराम ठोकून कमळ हातात घेतलं. आता मध्य प्रदेशमधूनही अशीच चर्चा सुरु झाली आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath)  काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चेला वेग आला आहे. कमलनाथ हे त्यांचे पुत्र खासदार नकुलनाथ यांच्यासह अनेक आमदारांना सोबत घेत भाजपमध्ये (BJP)  प्रवेश करणार असल्याचं वृत्त आहे. याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही, पण आज संध्याकाळी पाच वाजता कमलनाथ (Kamal Nath) समर्थक नेत्यांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. 


कमलनाथ आजच कमळ हातात घेणार?? 


मिळालेल्या माहितीनुसार, कमलनाथ शनिवारी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत काही आमदार आणि खासदार मुलगाही सोबत आहेत. रविवारी पाच वाजता कमलनाथ भाजपचं कमळ हातात घेण्याची शक्यता आहे. कमलनाथ यांच्या भाजप प्रवेशावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव  (Mohan Yadav)उपस्थित राहणार असल्याचे समजतेय. 


कमलनाथ भाजपमध्ये जाणार? का रंगली चर्चा - 


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजपात सामील होणार असल्याच्या चर्चेला शनिवारी बळ मिळाले. त्याला कारण कमलनाथ यांचं वक्तव्य होतं. त्यांना भाजप प्रवेशावर विचारलं तेव्हा ते म्हणाले की, असे काही घडले तर ते सर्वप्रथम मीडियाला त्याबद्दल माहिती देतील. तर दुसरीकडे मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी कमलनाथ भाजपमध्ये जाण्याच्या चर्चाला नकार दिला. पक्ष आणि गांधी-नेहरू घराण्याशी कमलनाथ यांचे जुने नाते असल्याचे सांगितले. कमलनाथ भाजपमध्ये सामील होणार असल्याची चर्चा सुरु असतानाच त्यांचा मुलगा आणि खासदार नकुलनाथ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील त्यांच्या प्रोफाइलमधून काँग्रेस नाव हटवलं आहे, त्यामुळे त्या चर्चेला अजून वाव मिळाला आहे.
 
कमलनाथ हे काँग्रेस नेतृत्वावर नाराज असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून माध्यमात सुरु आहेत. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु असतानाच  मध्य प्रदेश भाजपा प्रवक्ते आणि कमलनाथ यांचे माजी माध्यम सल्लागार नरेंद्र सलूजा यांच्या पोस्टनं लक्ष वेधलं. त्यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये कमलनाथ आणि नकुलनाथ यांचे काही फोटो शेअर केले आहेत. तसेच या फोटोंसह ‘जय श्री राम’ असं कॅप्शन दिलं आहे. 


अनेक दिवसांपासून प्रक्रिया सुरु -


मिळालेल्या माहितीनुसार, कमलनाथ यांच्या भाजप प्रवेशाची तयारी अनेक दिवसांपासून सुरु आहे. कमलनाथ यांनी आपल्या जवळच्या नेत्यांचेही सर्वेक्षण केले,   भाजपच्या तिकिटावर ते निवडून येतील का? याचा अंदाज बांधला. मध्य प्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसनं कमलनाथ यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या. तेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होते. पण पराभव होताच, काँग्रेसनं कमलनाथ यांना बाजूला सारलं. त्यामुळे कमलनाथ पक्ष नेतृत्वावर नाराज होते. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातेय. 


आणखी वाचा :


आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या वाटेवर, काँग्रेसला महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेशातही झटका?