Jammu Kashmir Congress : ​​काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी जम्मू-काश्मीर काँग्रेसच्या (Jammu Kashmir Congress) प्रचार समितीच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. मंगळवारीच (16 ऑगस्ट)  काँग्रेसने गुलाम नबी आझाद यांना काश्मीरमधील प्रचार समितीसह अनेक समित्यांचे प्रमुख बनवण्याची घोषणा केली होती. आझाद यांच्या शिफारशींकडे काँग्रेसने पूर्णपणे दुर्लक्ष केल्यानं ते नाराज असून, त्यामुळंच त्यांनी प्रचार आणि राजकीय समिती या दोन्ही पदांचा राजीनामा दिल्याची सुत्रांनी दिली आहे.


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा पद नाकारण्याचा निर्णय हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेसच्या मिशन काश्मीरला लागणार ब्रेक मानला जात आहे. कारण याच मिशन काश्मिरसाठी काँग्रेसने गुलाम नाबी आझाद यांना प्रचार समितीचे अध्यक्ष केले होते. त्यांच्या नेतृत्वात आगामी निवडणुकांची रणनिती आखली जाणार होती. पण नियुक्तीच्या काही तासांमध्येच त्यांनी आपला राजीनामा दिला. दरम्यान, गुलाम नबी आझाद यांच्या निकटवर्तीयांनीही सांगितले की, त्यांना कोणतेही पद नको असल्याचे त्यांनी पक्ष नेतृत्वाला आधीच सांगितले होते. मात्र, त्यानंतरही त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मंगळवारीच नियुक्त झालेले जम्मू-काश्मीर काँग्रेसचे नवे अध्यक्ष विकार रसूल वानी हे गुलाम नबी आझाद यांचे खास मानले जातात.


काँग्रेस राज्य युनिटची पुनर्रचना करत आहे


जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने तयारीला सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य युनिटची पुनर्रचना देखील केली आहे. काँग्रेसने माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांची जम्मू-काश्मीरच्या प्रचार समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती केली होती. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा हा निर्णय निवडणुकीच्या दृष्टीने विशेष मानला जात होता. मात्र, गुलाम नबी आझाद यांनी जबाबदारी नाकारत पदाचा राजीनामा दिला आहे. 


काँग्रेसने केलेल्या इतर नियुक्त्या


जम्मू-काश्मीर काँग्रेसच्या नव्या नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये रमण भल्ला यांना हिंदू चेहरा म्हणून प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नव्या नियुक्त्यांमध्ये जम्मू विभागाचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे. आझाद, वाणी आणि भल्ला हे तिघेही जम्मू प्रदेशातून येतात. काश्मीर प्रदेशातील ज्येष्ठ नेते तारिक हमीद कारा यांच्याकडे राजकीय घडामोडी समितीची जबाबदरी देण्यात आली आहे. तर माजी केंद्रीय मंत्री सैफुद्दीन सोज यांना जाहीरनामा समितीचे प्रमुख करण्यात आले आहे.


जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच निवडणुका होण्याची शक्यता  


2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे 12 आमदार विजयी झाले होते. यापूर्वी 2008 ते 2014 या काळात काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्सच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये सामील होती. आगामी निवडणुकीत काँग्रेस आघाडीत सहभागी होणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 2019 मध्ये कलम 370 रद्द करून मोदी सरकारने जम्मू-काश्मीर आणि लडाखचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले आहे. मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा कायम ठेवण्यात आली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: