AK Antony Son Joins BJP:  केरळमध्ये पक्षविस्तारासाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपने काँग्रेसला धक्का दिला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी संरक्षण मंत्री ए.के. अँटनी यांचा मुलगा अनिल अँटोनी आज भाजपात प्रवेश केला. जवळपास दोन महिन्यांपूर्वी अनिल अँटनी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. गुजरात दंगलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहभागाबाबत बीबीसीने डॉक्युमेंटरी केली होती. त्यावरून काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर नाराज होत अनिल अँटनी यांनी काँग्रेस सोडली होती. 


ए.के. अँटोनी हे केरळचे दोन वेळेस मुख्यमंत्री राहिले आहेत. युपीए सरकारच्या काळात अँटनी यांनी देशाचे संरक्षण मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. अनिल अँटनी यांनी केरळ काँग्रेसच्या  सोशल मीडिया टीमची जबाबदारी सांभाळली होती. आज, दिल्लीत अनिल अँटनी यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, व्ही. मुरलीधरन, केरळ भाजप प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. 


अनिल अँटनी यांनी यावेळी म्हटले की, एक भारतीय तरुण या नात्याने मला वाटते की राष्ट्र उभारणी आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या पंतप्रधानांच्या व्हिजनमध्ये योगदान देणे ही माझी जबाबदारी आणि कर्तव्य आहे.






बीबीसीच्या डॉक्युमेंटरीवर घेतला होता आक्षेप 


गुजरात दंगलीवर बीबीसीने तयार केलेल्या डॉक्युमेंटरीला भारताच्या स्वायत्ता संस्थांनी व्यक्त केलेल्या मतांपेक्षा अधिक महत्त्व देणे ही धोकादायक प्रवृत्ती असल्याचे त्यांनी म्हटले. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे देशाच्या सार्वभौमत्वावर परिणाम होईल. त्यांनी बीबीसीच्या माहितीपटाला भारताविरुद्ध पक्षपाती म्हटले होते. या प्रतिक्रियेनंतर अनिल अँटनी यांना काँग्रेसमधून टीकेला सामोरे जावे लागले होते. 


पियुष गोयल यांनी केले अनिल अँटनी यांचे स्वागत


पक्ष सोडण्यापूर्वी अनिल अँटनी यांच्याकडे केरळमधील काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलची जबाबदारी होती. भाजपमध्ये त्यांचे स्वागत करताना भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, अनिल अँटनी हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहेत. अनिल अँटोनी यांचे काम पाहिल्यावर मी खूप प्रभावित झालो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांचे विचार मिळतेजुळते आहेत. आम्हांला खात्री आहे की ते अतिशय सक्रिय भूमिका बजावत राहतील आणि दक्षिण भारतात भाजपचा ठसा वाढवण्यात मदत करतील,असा विश्वास पीयूष गोयल यांनी व्यक्त केला.