मुंबई : खरंतर आतापर्यंत आजवर आपण एक दिवसाचं, दोन दिवसाचा अथवा आठ दिवसाचं उपषोण याबाबत आपण नेहमीच ऐकतो. पण आता काँग्रेसने देशाला इन्स्टंट उपवास हा नवा पर्याय दिला आहे. अॅट्रसिटी कायद्यातील बदलांना विरोध आणि भारत बंदवेळी दलितांवर झालेल्या अत्याचारांविरोधात काँग्रेसनं आज देशभरात तीन ते चार तासांचा इन्स्टंट उपवास केला.


नवी दिल्लीत उपोषणाचा कार्यक्रम ३ तास उशिरानं म्हणजे १ वाजता सुरु झाला. कारण, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राजघाटावर नियोजित वेळेपेक्षा ३ तास उशिरानं पोहोचले. तर मुंबईतही काँग्रेस कार्यकर्त्यांनी १० ऐवजी ११ वाजता उपोषणाला सुरुवात केली.

तर दुसरीकडे दिल्लीतील काँग्रेस नेत्यांची उपोषणाची लबाडीही उजेडात आली. उपोषणाला सुरुवात करण्यापूर्वी दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजन माकन आणि अन्य नेत्यांनी छोले-भटुऱ्यांवर ताव मारल्याचा दावा भाजपने केला आहे. त्यामुळे काँग्रेसने केलेलं हे उपोषण होतं की चेष्टा? असा सवालही उपस्थित केला जात आहे.