नवी दिल्ली : गोपनीयतेचं कारण देत सरकार राफेल ज्या लढाऊ विमानांची किंमत लपवत होतं त्या विमानाची किंमत अखेर उघड झाली आहे. राफेल विमानांची निर्मिती करणाऱ्या डासू कंपनीनेच आपल्या वार्षिक अहवालात भारताला राफेल विमान प्रत्येकी 1670.70 कोटी रुपये प्रत्येकी या किमतीने विकल्याचं म्हटलं आहे.

राफेल विमानांची डील खुद्द मोदींनी बदलली, राहुल गांधीचा गंभीर आरोप

मागील दोन महिन्यात राफेल विमान घोटाळ्याचा आरोप करत काँग्रेसचे महासचिव गुलाम नबी आझाद, प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी डासू एव्हिएशन कंपनीच्या वार्षिक अहवालाची एक प्रतच जाहीर केली आहे.

https://twitter.com/rssurjewala/status/972069525582737414

काँग्रेस प्रवक्ते सुरजेवाला यांनी आरोप केला आहे की राफेल विमान खरेदीचा जो करार 2012 मध्ये एका विमानासाठी 526.1 कोटी रुपयांमध्ये यूपीए सरकारने केला होता, तोच मोदी सरकारने आता 1670.70 रुपयांमध्ये केला आहे. म्हणजेच काँग्रेसने 2012 साली 526.1 कोटी रुपयांमध्ये एका राफेल विमानासाठी केलेला करार मोदी सरकारने 1670.70 कोटी रुपये केला. सुरजेवाला यांनी कंपनीच्या वार्षिक अहवालाची प्रत जारी करत मोदींनी या घोटाळ्यावर स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी केली आहे.

भारत-फ्रान्सच्या राफेल विमान करारावर शिक्कामोर्तब!

राफेल डील काय आहे?

फ्रान्स भारताला 2019 अखेरपर्यंत 36 राफेल लढाऊ विमान देणार आहे. सप्टेंबर 2016 साली भारत आणि फ्रान्स यांच्यातील या करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती.
काँग्रेसचा आक्षेप नेमका कशावर?

काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी या 36 विमानांच्या किंमतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मोदी सरकारने देशातील प्रसिद्ध कंपनी एचएएलला बाजूला सारलं आणि रिलायन्स ग्रुपला फायदा करुन दिला, असा आरोप काँग्रेसचा आहे. तर यूपीएच्या डीलमध्ये फ्रान्सची डासू एव्हिएशन आणि एचएएल यांच्यात करार झाला होता.