नवी दिल्ली : कर्नाटकात बीएस येदियुरप्पा सत्तेवर असताना कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण झाल्याचा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. यासंबधी एक डायरी सीबीआयला मिळाली असल्याचा दावाही सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. डायरीमध्ये 1800 कोटींच्या व्यवहाराबद्दल लिहिलं असल्याचा सुरजेवाला यांनी दावा केला आहे. 'द कॅरावान' मॅगझिननं प्रसिद्ध केलेल्या वृत्ताच्या आधारे काँग्रेसने हे आरोप केले आहेत.
या डायरीच्या प्रत्येक पानावर येदियुरप्पा यांचं हस्ताक्षर असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मात्र डायरीची सत्यतेबाबत कोणताही दावा काँग्रेसने केलेला नाही. या संपूर्ण प्रकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून भाजपच्या बड्या नेत्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
डायरीतील मजकुरानुसार, 2600 कोटी रुपयांची वसूली करण्यात आली आहे. यातील 1800 कोटी रुपये भाजपच्या केंद्रीय समितीला देण्यात आले आहेत. कर्नाटकात येदियुरप्पा सत्तेवर असताना त्यांनी भाजपच्या बड्या नेत्यांना लाच दिल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. विशेष म्हणजे 2017 पासून ही डायरी आयकर विभागाच्या ताब्यात असल्याचा दावाही काँग्रेसने केला आहे.
भाजपच्या केंद्रीय समितीला हे 1800 कोटी रुपये देण्यात आले आहेत. या समितीमध्ये पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांचा समावेश आहे. तसेच 250 कोटी रुपये न्यायाधीशांना दिल्याच उल्लेखही डायरीत असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.