मुंबई : डिजिटल व्यवहारांमधील वाढत्या फसवणुकींबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना सतर्क केलं आहे. डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून फसवणूक झाल्यास कसलीही चिंता न करता तीन कार्यालयीन दिवसांच्या आत बँकेत तक्रार करा, त्यानंतर जबाबदारी बँकेची असेल, असं आरबीआयने म्हटलं आहे.


सरकारकडून ऑनलाईन व्यवहारांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. मात्र यासोबतच फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. बँका अनेकदा हात वर करतात, ज्यामुळे ग्राहक हतबल असतात. मात्र आरबीआयने आता ग्राहकांना सतर्क करत तीन दिवसांच्या आत तक्रार करण्याचं आवाहन केलं आहे.

आरबीआयने आजपासून देशभरात वित्तीय साक्षरता आठवड्याची सुरुवात केली आहे. एटीएमचे अयशस्वी व्यवहार, ग्राहकांना पूर्वसूचना न देताच खात्यावर शुल्क आकारणं याबाबतीत ग्राहक आपल्या शाखेत तक्रार करु शकतात, असं आरबीआयने सांगितलं.

एका महिन्याच्या आत तक्रारीचं निवारण न झाल्यास बँकिंग लोकपालच्या समक्ष तक्रार करता येईल. चार ते आठ जून दरम्यान चालणाऱ्या या कार्यक्रमात बँक आणि ग्राहक यांच्यात आर्थिक सेवा, डिजिटल माध्यमांचा उपयोग यासह विविध गोष्टींबाबत जागरुकता निर्माण करण्यात येणार आहे.

भारत जगातला एकमेव देश आहे, जिथे अशा प्रकारची सेवा दिली जात आहे, असं आरबीआयने सांगितलं. वित्तिय साक्षरतेअंतर्गत बँक शाखांमध्ये बॅनर, पोस्टर यांच्या माध्यमातून सुरक्षित इलेक्ट्रॉनिक व्यवहार आणि डिजिटल बँकेच्या अनुभवासाठी ग्राहकांच्या आर्थिक सुरक्षेच्या हमीवरही भर देण्यात येणार आहे.