नवी दिल्ली : मल्टीनॅशनल कंपनी एस्सार ग्रुपवर देशातील अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे फोन कॉल अवैधरित्या टॅप केल्याचा आरोप होत आहे. एस्सार ग्रुपने 2001 ते 2006 या काळात एनडीए आणि यूपीए सरकारच्या अनेक कॅबिनेट मंत्र्यांसह उद्योजक मुकेश अंबानी, अनिल अंबानी यांचेही फोन कॉल टॅप केले होते. इतकंच नाहीतर अटल बिहारी वाजपेयींच्या कार्यकाळातील पंतप्रधान कार्यालयातील अधि‍काऱ्यांचाही समावेश आहे.


इंग्लिश वृत्तपत्र 'इंडियन एक्स्प्रेस'ने या संदर्भातील वृत्त प्रकाशित केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वकील सुरेन उप्पल यांनी 1 जून रोजी यासंदर्भात 29 पानांची एक तक्रार पीएमओला पाठवली. एस्सार ग्रुपच्या एका कर्मचाऱ्यावर कथित फोन कॉल टॅप केल्याचा आरोप आहे. सुरेन उप्पल हे त्या कर्मचाऱ्याचे वकील आहेत. एनडीए सरकारमधील मंत्री प्रमोद महाजन यांचाही फोन टॅप केल्याचंही समजतं. काही फोन टॅपिंग टेलिकॉम परवानासंबंधी झाले होते.

सुरेश प्रभु, प्रफल्ल पटेल यांचाही फोन टॅप
सुरेन उप्पल यांच्या तक्रारीनुसार, विद्यमान रेल्वेमंत्री सुरेश प्रभु, माजी मंत्री प्रफुल्ल पटेल आणि राम नाईक, रिलायन्स ग्रुपचे मुकेश आणि अनिल अंबानी, त्यांची पत्नी टीना अंबानी आणि अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोन टॅप केले होते. यासोबतच सपा नेते अमर सिंह, तत्कालीन गृह सचिव राजीव महर्षी, आयडीबीआय बँकेचे माजी संचालक पीपी. वोहरा, आयडीबीआय बँकेचेच माजी सीईओ आणि एमडी केव्ही. कामथ आणि बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक ललिता गुप्ते यांचाही फोन टॅप केला होता.

2G प्रकरणात एस्सारवर खटला सुरु

बहुचर्चित 2G स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्यात एस्सारवर खटला सुरु आहे. फोनच्या टॅपिंगमुळे सत्तेची दलाली, कारभारात भ्रष्टाचार, सरकार-उद्योजकांमधील डील आणि अशाच अनेक गोपनीय माहितीवर एस्सारची नजर होती.

 

सर्वोच्च न्यायालयात फोन टॅपिंगवर सुनावणी

सर्वोच्चन न्यायालयात सध्या एक जनहित याचिकेवर सुनावणी सुरु आहे. यामध्ये आपल्या फायद्यासाठी एस्सारने काही नेत्यांचे, अधिकाऱ्यांचे आणि पत्रकारांचे फोन टॅप केल्याचा आरोप आहे. केंद्र सरकारने ही याचिका दाखल केली आहे.

एस्सारने फोन टॅपिंगचे आरोप फेटाळले

मात्र कंपनीने फोन टॅपिंगचे आरोप फेटाळले आहेत. एस्सारच्या ज्या माजी कर्मचाऱ्यावर फोन टॅपिंगचा आरोप आहे, त्याचं नाव  अलबासित खान आहे. सुरेन उप्पल त्याचेच वकील आहेत. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी एस्सार ग्रुप आणि इतर कंपन्यांना नोटीस पाठवली आहे.

'प्रशांत आणि रविकांत रुईया यांच्या सांगण्यावरुन फोन टॅपिंग'

सुरेन उप्पल यांच्या माहितीनुसार, अलबासित खान एस्सार ग्रुपमध्ये सिक्युरिटी हेड होते. टॉप मॅनेजमेंटच्या सांगण्यावरुन फोन टॅपिंग केल्याचा दावा खानने केला आहे. 2001 मध्ये एस्सारच्या प्रशांत आणि रविकांत रुईया यांनी मला फोन टेलिकॉम परवान्याशीसंबंधित प्रकरणात फोन टॅप करण्यास सांगितलं होतं, असंही अलबासित खानने सांगितलं. ज्या व्यक्तींचे फोन टॅप केले आहेत, त्यांच्या नंबरचा उल्लेख सुरेन उप्पल यांच्या तक्रारीत आहे.

 

आरोपांची चौकशी व्हायला हवी : एस्सार

वृत्तपत्रात म्हटलं आहे की, या संपूर्ण प्रकरणी एस्सार ग्रुपने सर्व आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. आम्ही या प्रकरणी उत्तर देऊ.  सुरेश उप्पल यांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे की, खानची पार्श्वभूमी औषध अंमलबजावणी असतानाही प्रशांत रुईयाने त्याला कंपनीता  सिक्युरिटी हेड बनवलं. अलबासित खान 2001 ते 2011 पर्यंत एस्सार ग्रुपचे सिक्युरिटी हेड होते.