नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. काटजू यांनी सौम्या बलात्कार प्रकरणातील दोषी गोविंदसामीला हत्येच्या आरोपातून मुक्त केल्याच्या निर्णयावर टीका केली होती. या प्रकरणी निर्णय देणाऱ्या दोन्ही खंडपीठांनी निवृत्त न्यायमूर्ती काटजू यांनी कोर्टात येऊन निर्णय कसा चुकीचा आहे, हे स्पष्ट करण्यास सांगितले आहे.
काटजू यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं होतं की, एखादा विद्यार्थीही असा चुकीचा निर्णय देऊ शकत नाही. सौम्या प्रकरणात कोर्टाने गोविंदसामीला हत्येच्या आरोपातून मुक्त केले होते. मात्र, बलात्कारप्रकरणी गोविंदसामीला जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे.
केरळ सरकारकडून या प्रकरणाबाबतच्या पुनर्विचार याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टाने म्हटलं की, एका निवृत्त न्यायमूर्तींनी खंडपीठाचा निर्णय चुकीचा असल्याचं ब्लॉगमध्ये म्हटलंय. त्यामुळे काटजू यांच्याकडून हे जाणून घ्यायला आवडेल की, कोर्टाचा निर्णय कशाप्रकारे चुकीचा आहे.
दरम्यान, काटजू यांना 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या खंडपीठासमोर हजर राहावं लागणार आहे.