अहमदाबाद : निरमा यूनिव्हर्सिटी आयोजित “सैन्याला जाणून घ्या” या कार्यक्रमात संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रशिक्षणाला दिले. पर्रिकर म्हणाले, "पंतप्रधान मोदी हे महात्मा गांधी यांच्या राज्यातून आहेत आणि संरक्षणमंत्री गोव्यातून आहे. त्यामुळे यानुसार सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय संघाच्या प्रशिक्षणाला जातं."
एवढंच नव्हे, तर संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर म्हणाले, "उरी हल्ल्यानंतर सोशल मीडियावर आपल्या पंतप्रधानांवर काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर सर्जिकल स्ट्राईकचे पुरावेही मागू लागले. मुळात काही लोक असे असतात, ज्यांना कितीही पुरावे द्या, तरीही त्यांचं समाधान होत नाही."
सीमेवर सैनिक कशाप्रकारे देशाची सुरक्षा करतात, याबाबत काही उदाहरणांच्या माध्यमातून संरक्षणमंत्री पर्रिकर यांनी माहिती दिली. पाकव्याप्त काश्मीरमधील सर्जिकल स्ट्राईकनंतर देशभरातील युवकांना याबाबत माहिती देण्यासाठी लष्कराकडून विविध चर्चासत्र आणि कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. देशातील तरुणांना आपल्या सैनिकांबद्दल माहिती असावी, असा या कार्यक्रमांचा उद्देश आहे.