चेन्नई : पतीच्या अंत्यविधीवेळीच जिने देशसेवेचा निश्चय केला, ती वीरपत्नी स्वाती महाडिक आज भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू झाल्या आहेत. वर्षभराच्या खडतर प्रशिक्षणानंतर स्वाती महाडिक देशसेवेसाठी सज्ज झाल्या आहेत.

चेन्नईतल्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीतील कार्यक्रमात शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांनी लेफ्टनंटपदाची शपथ घेतली. या सोहळ्यासाठी महाडिक कुटुंबीय चेन्नईत दाखल झालं होतं.

गेल्या अकरा महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुण्यातील देहूरोड इथे होणार आहे.

पतीच्या पार्थिवावर देशसेवेचा निर्धार
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडाच्या जंगलात देशाच्या सीमेचं रक्षण करत असताना, सह्याद्रीचा वीरपुत्र संतोष महाडिक यांना वीरमरण आलं. अतिरेक्यांना टिपून मारणाऱ्या संतोष महाडिक हे अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात धारातीर्थी पडले. 17 नोव्हेंबर 2015 रोजी साताऱ्याचा हा जवान शहीद झाला. या शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर ‘शौर्यचक्र’ पुरस्कारही देण्यात आला होता.

त्यांच्या पार्थिवावर पत्नी स्वाती यांनी आपण स्वत: आणि मुलं आर्मीतच जातील, असा निर्धार केला होता.

चेन्नईत खडतर प्रशिक्षण
देशसेवेसाठी संधी मिळण्यासाठी स्वाती महाडिक यांनी जोरदार प्रयत्न केले होते. त्यांच्या निर्धाराला हिरवा कंदील मिळाल्यानंतर त्यांनी चेन्नईत एक वर्ष अथक प्रयत्न केले. चेन्नईत मिलिट्री ट्रेनिंग सेंटरमध्ये स्वाती यांच्यासोबतचे सर्व उमेदवार हे किमान 10 वर्षांनी लहान होते. त्यामुळे स्वाती यांना त्यांच्याप्रमाणे प्रशिक्षण घ्यावं लागलं.



प्रशिक्षणात अव्वल
देशसेवेच्या उद्देशाने झपाटलेल्या स्वाती महाडिक या प्रशिक्षणार्थींमध्येही अव्वल राहिल्या. चेन्नईतील ट्रेनिंग सेंटरवर झालेल्या सोहळ्यात ‘बेस्ट कॅडेट’चं पदक त्यांना मिळालं. हे पदक कुटुंबीयांना दाखवताना त्यांना भावना अनावर झाल्या होत्या.

पुणे विद्यापीठातून पदवी
स्वाती यांनी पुणे विद्यापीठातून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांना मिलिट्रीमध्ये दाखल होण्यासाठी तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आणि लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंह यांनी वयाची अट शिथील केली. त्यांचा देशसेवेचा दृढ निश्चय आणि समाजाप्रती बांधिलकी पाहून, आम्हाला प्रभावित केलं, असं लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

स्वाती महाडिकांच्या धाडसाचं कौतुक
त्यांनी खडतर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलं. स्वाती महाडिक यांनी आज लेफ्टनंटपदाची शपथ घेतली. पतीच्या निधनानंतर वीरपत्नी स्वाती महाडिक यांच्या धाडसाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या

सातारा सैनिक स्कूलच्या स्टेडियमला शहीद महाडिकांचं नाव

देखना है जोर कितना...शहीद महाडिकांची पत्नी 'इंडियन आर्मी'त!

शहीद संतोष महाडिक यांचं शेवटचं व्हॉट्सअॅप स्टेटस

शहीद संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्य चक्र

‘माझी मुलगी आणि मुलगा लष्करातच जातील’ वीरपत्नीचा निर्धार

शहीद संतोष महाडिक अनंतात विलीन

शहिदांच्या कुटुंबियांबाबत उदयनराजे म्हणतात…