नवी दिल्ली : भारतीय सैन्यातील वीरांच्या अगम्य शौर्याने लोंगेवालाचं युद्ध जिंकलं, त्या युद्धाचे नायक कर्नल धरमवीर यांचं निधन झालं. संरक्षण मंत्रालयाच्या जनसंपर्क कार्यालयाने सांगितलं की, लोंगेवाला युद्धाचे नायक कर्नल धरमवीर यांचं सोमवारी गुडगाव इथल्या त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. कर्नल धरमवीर यांनी 1992 ते 1994 या काळात 23व्या पंजाब बटालियनचे नेतृत्व केलं. विशेष म्हणजे 'बॉर्डर' हा सुपरहिट चित्रपट 1971 मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातील लोंगेवाला युद्धावर बनवण्यात आला आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना याने कर्नल धरमवीर यांची व्यक्तिरेखा साकारली होती.


1971 च्या युद्धात लेफ्टनंट असलेल्या धरमवीर यांच्या नेतृत्त्वातच भारतीय सैन्याच्या छोट्या तुकडीने जैसलमेरमधील लोंगेवाला चेकपोस्टच्या फॉरवर्ड पोस्टवर तैनात होती. रात्री बाराच्या सुमारास 2500 सैनिक आणि 65 रणगाड्यांसह पाकिस्तानी लष्कराने या चेकपोस्टवरुन नवी दिल्लीला जाण्याचा भयंकर कट रचला होता, परंतु मेजर कुलदीपसिंग चांदपुरी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय तुकडी आणि लेफ्टनंट धरमवीर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय तुकडीने त्यांना रोखून ठेवलं.


4 डिसेंबरच्या रात्री काय झालं होतं?
1971 च्या युद्धात कर्नल धरमवीर हे तरुण अधिकारी होते. पाकिस्तानसोबतच्या लोंगेवाला युद्धादरम्यान त्यांनी दाखवलेल्या सतर्कतेसाठी ते नेहमीच स्मरणात राहतील. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान, 4 डिसेंबरच्या रात्री जैसलमेरच्या लोंगेवाला चेकपोस्टवर सैनिकांची फारशी तैनाती नव्हती. लेफ्टनंट धरमवीर यांच्या नेतृत्वाखालील गस्त पथक तिथे गस्त घालत होते. एका मुलाखतीत लेफ्टनंट धरमवीर यांनी सांगितलं की, रात्री 10 वाजता ते फक्त 25 सैनिकांसह रेशनसह गस्तीवर जात होते. त्यावेळी पाकिस्तानकडून काही कारवाया सुरु झाल्या. लेफ्टनंट धर्मवीर यांनी तातडीने ब्रिगेडियर चांदपुरी यांना माहिती दिली. काळजी करु नका, धैर्याने लढा, असं त्यांनी सांगितलं. यानंतर लेफ्टनंट धरमवीर पुढे सरसावले तेव्हा ते थक्क झाले. पाकिस्तानच्या दिशेने 65 रणगाडे आणि 2500 सैनिक आगेकूच करत होते.


असा होता पाकिस्तानचा प्लॅन
त्यावेळी बांगलादेशात म्हणजे पूर्व पाकिस्तानमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर पाकिस्तानने लोंगेवाला मार्गे नवी दिल्ली गाठण्याचा भयंकर कट रचला होता. या कटांतर्गत त्यांनी 65 टँक आणि 1 मोबाईल इन्फंट्री ब्रिगेडसह 2500 सैनिकांना जैसलमेरमधील लोंगेवाला चौकीकडे पाठवले. त्यावेळी मेजर कुलदीप सिंह चांदपुरी यांच्या नेतृत्वाखाली 120 सैनिकांचे पथक तिथे तैनात होतं. त्यांच्याकडे लहान शस्त्रे आणि काही तोफा होत्या. याशिवाय बीएसएफचे उंट पथकही होते. लेफ्टनंट धरमवीर यांनी मेजर कुलदीप चांदपुरी यांना याची माहिती दिली तेव्हा त्यांच्याकडे दोन पर्याय होते.


दोन पर्यायांपैकी दुसरा पर्याय निवडला
पहिला पर्याय होता चेकपोस्ट सोडून माघारी जाणं आणि दुसरा पर्याय होता लढा देणं. चांदपुरी यांनी सामना करण्याचे निर्देश दिले. शत्रूचे टँक आणि वाहनांचा 20 किमी लांबीचा ताफा आला. चेकपोस्टसमोर फक्त काही सैनिकांनी अँटी टँक माईन्सचा सापळा रचला होता. चेकपोस्ट अवघ्या 30 मीटरच्या अंतरावर असताना शत्रूने तोफा डागायला सुरुवात केली.  धरमवीर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय वीरांनी अँटी टँग गनने पाकिस्तानी रणगाड्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. अँटी टँक माईन्समुळे रणगाडे कोसळू लागताच पाकिस्तानी सैन्य थांबलं आणि त्यांनी जोरदार गोळीबार सुरु केला. तरीही रात्रभर भारतीय जवानांनी त्यांच्याशी जोरदार मुकाबला केला.


दुसऱ्या दिवशी दुपारी हल्ला पूर्णपणे थांबला. यादरम्यान हवाई हल्ल्यात पाकिस्तानचे 12 रणगाडे उद्ध्वस्त झाले. याशिवाय भारताने काही रणगाडे ताब्यात घेतले होते. यावेळी पाकिस्तानच्या एकूण 100 वाहनांचे नुकसान झाले. यानंतर भारतीय टँक विभागाची रेजिमेंट पुढे आल्यावर पाकिस्तानी लष्कराला माघार घ्यावी लागली.


लोंगेवालाचं युद्ध हे भारतीय सैन्याच्या धैर्याचं, सामर्थ्याचं आणि शौर्याचं प्रतीक आहे. 1971 च्या युद्धाला 50 वर्षे झाली आहेत. आता हळूहळू या युद्धातील वीरांचं देहावसान होत आहे. लोंगेवाला युद्धाचे मुख्य नायक ब्रिगेडियर कुलदीप सिंह चांदपुरी यांचं 2018 मध्ये मोहाली इथे निधन झालं. ब्रिगेडियर चांदपुरी यांना महावीरचक्र प्रदान करण्यात आलं होतं.