भोपाळ : मध्य प्रदेशच्या शिवपुरीमध्ये एका कोंबड्याने मुलीला चावा घेतल्याने प्रकरण थेट पोलिसांपर्यंत गेलं आहे. मुलीच्या कुटुंबियांनी कोंबड्यासह पोलीस स्टेशन गाठलं. त्यानंतर कोंबड्याच्या मालकालाही पोलिसांनी बोलावून घेतलं. त्यानंतर प्रकरण बोलणी करुन मिटवण्यात आलं.
फिजिकल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शनिवारी ही घटना घडली आहे. रितिका नावाची मुलगी घराबाहेर खेळत होती. त्यावेळी खेळत असताना तिला एका कोंबड्याने चावा घेतला. रितिकाच्या कुटुंबियांना ही गोष्ट कळाल्यानंतर त्यांनी कोंबड्याच्या मालकाची तक्रार पोलिसांकडे केली.
त्यानंतर पोलिसांनी कोंबड्याच्या मालकाला पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतलं. त्यानंतर कोंबड्याचे मालक पप्पू जाटवची पत्नीही रडत-रडत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि कोंबडा परत करण्याची मागणी केली. शिक्षा द्यायची असेल तर कोंबड्याला नाही, मला द्या अशी विनंती तिने पोलिसांनी केली.
कोंबड्याच्या मालकाने पोलिसांना आश्वासन दिलं की, यानंतर आमचा कोंबडा रस्त्यावर फिरणार नाही, तशी आम्ही काळजी घेऊ. त्यानंतर पोलिसांना दोन्ही पक्षाची बाजू ऐकून दोघांची समजून काढून प्रकरण तिते मिटवलं आणि पप्पू जाटव यांना त्यांचा कोंबडाही परत करण्यात आला.