पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृतीबद्दल सुरु असलेल्या उलट सुलट चर्चांना काल (30 ऑक्टोबर) पूर्णविराम मिळाला. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी काल दोनापावल येथील खाजगी निवासस्थानी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची (आयपीबी) बैठक घेऊन 230 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजूरी देत विरोधकांची तोंडं बंद केली.


दिल्ली येथील एम्समध्ये उपचार घेऊन मुख्यमंत्री पर्रिकर 14 ऑक्टोबर रोजी गोव्यात परतले होते. एम्समधून स्ट्रेचरवरुन बाहेर येताना त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून त्यांच्या प्रकृती बद्दल उलट सुलट चर्चा सुरु होती. पर्रिकर यांच्या प्रकृतीबाबत कमालीची गुप्तता पाळली जात होती. चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी दिल्लीतून निघताना त्यांचे दर्शन लोकांना बातम्यांमध्ये झाले होते. त्यानंतर स्ट्रेचरवरील व्हिडीओ वगळता, गोव्यात परतल्यापासून मुख्यमंत्र्यांचं कोणतंही दर्शन लोकांना झाले नव्हते.

22 ऑक्टोबर रोजीच्या गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची बैठक मुख्यमंत्री पर्रिकर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतली होती. त्यात काही प्रस्तावांवर चर्चा झाली होती. बैठकीनंतर मुख्यमंत्री पर्रिकर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हजेरी लावली तर त्याचे पुरावे द्या अशी मागणी करत काँग्रेसने गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला होता.

काँग्रेसचे प्रवक्ता जितेंद्र देशप्रभू यांनी थेटपणे भाजपला आव्हान देत मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या प्रकृतीबद्दल व्हिडीओ पुरावे द्या, अशी मागणी केल्यानंतर हा विषय जास्तच चर्चेत आला होता. काँग्रेसने काल मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या खाजगी निवासस्थानी झालेल्या आयपीबी आणि आजच्या मंत्रिमंडळ बैठकीस आक्षेप नोंदवत निषेध केला होता.

या पार्श्वभूमीवर कालची बैठक पार पडली. बैठकीचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले असून मुख्यमंत्री कार्यालयाने सीएमओच्या ट्विटर हॅण्डलवरुन मुख्यमंत्री बैठक घेत असल्याचा फोटो जाहीर करत विरोधकांची तोंडं बंद करण्याचा प्रयत्न केला.


मुख्यमंत्री पर्रिकर यांची प्रकृती आता चांगलीच सुधारत असल्याची ग्वाही सभापती प्रमोद सावंत, पर्यटनमंत्री बाबू आजगावकर आणि आयटी मंत्री रोहन खवंटे यांनी दिली आहे. आजगावकर आणि खवंटे यांनी आयपीबी सदस्य म्हणून बैठकीत भाग घेतला होता तर सभापती सावंत यांनी बैठक सुरु होण्यापूर्वी मुख्यमंत्री पर्रिकर यांची स्वतंत्रपणे भेट घेतली.

आज सायंकाळी मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या दोनापावल येथील खाजगी निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. काँग्रेसने खाजगी निवासस्थानी होत असलेल्या बैठकीला आक्षेप घेतला आहे.