Arvind Kejriwal : दिल्लीत 2020 मध्ये झालेल्या दंगलीत जीव गमावलेल्या आयबी कर्मचाऱ्याच्या भावाला अरविंद केजरीवाल सरकारने सरकारी नोकरी दिली आहे. दिल्ली हिंसाचारात अंकित शर्माची हत्या झाली होती. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी गुरुवारी या कुटुंबाला सरकारी नोकरीचे प्रमाणपत्र दिले. प्रमाणपत्र देण्यात आल्यानंतर केजरीवाल यांनी ट्विटवर फोटो शेअर केला आहे. त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "माणसाची कमतरता कधीच भरून निघू शकत नाही. परंतु, ही सरकारी नोकरी आणि 1 कोटी रूपयांची मदत अंकितच्या कुटुंबाला बळ देईल. भविष्यातही त्यांच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करू."
फेब्रुवारी 2020 मध्ये दिल्लीत दंगल झाली होती. या दंगलीत जवळपास 53 लोकांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. आयबी अधिकारी अंकित शर्मा यांचा मृतदेह 26 फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाला होता. त्यानंतर दिल्लीतील चांदबाग भागातील त्यांच्या घराजवळील नाल्यात मृतदेह सापडला होता.
दरम्यान, या दंगलीच्या कट प्रकरणातून जामीन मिळाल्यानंतर बुधवारी संध्याकाळी काँग्रेसच्या माजी नगरसेविका इशरत जहाँची तिहार तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. एका वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याने सांगितले की, इशरत जहाँची बुधवारी संध्याकाळी पावणे आठ वाजता मंडोली तुरुंगातून सुटका करण्यात आली.
दिल्ली न्यायालयाने सोमवारी इशरत जहाँला जामीन मंजूर केला होता. इशरत जहाँ आणि इतर अनेकांवर ईशान्य दिल्लीत फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या दंगलीत मुख्य सूत्रधार म्हणून भूमिका बजावल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दंगलींमध्ये 53 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 700 हून अधिक लोक जखमी झाले होते.
महत्वाच्या बातम्या