चंदिगढ : बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शाळेच्या मुख्याध्यापिकेची गोळी झाडून हत्या केली आहे. हरियाणातील यमुनानगरमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कमी उपस्थितीबाबत मुख्याध्यापिका ओरडल्यामुळे 18 वर्षीय आरोपीने हे टोकाचं पाऊल उचललं.
स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूलमध्ये शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पालक सभा सुरु होती. त्यावेळी आरोपी विद्यार्थ्याने मुख्याध्यापिका रितू छाब्रा यांना आपला प्रोजेक्ट घेण्यास जबरदस्ती केली. मात्र छाब्रा यांनी नकार दिल्यामुळे विद्यार्थ्याने वडिलांच्या रिव्हॉल्वरमधून आपल्या शिक्षिकेवर तीन गोळ्या झाडल्या.
एक गोळी रितू यांच्या चेहऱ्यावर लागली, तर दोन छातीतून आरपार घुसल्या. एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना दुपारी दोन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
विद्यार्थी चेहरा झाकूनच शाळेत आला होता. गोळीबारानंतर पळून जाण्याचा त्याने प्रयत्न केला, मात्र सुरक्षारक्षक आणि पालकांनी त्याला पकडलं. विद्यार्थ्याला अटक केली असून हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी वडिलांनाही ताब्यात घेतलं असून आपल्या पाल्याच्या अभ्यासाबाबत काहीच माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं.
आरोपी विद्यार्थी अभ्यासात कच्चा होता. वर्गात वारंवार अनुपस्थिती आणि सुमार कामगिरीबद्दल मुख्याध्यापिका सर्व विद्यार्थ्यांसमोर त्याला शिक्षा करायच्या, असा आरोप त्याने केल्याचं यमुनानगर पोलिसांनी सांगितलं. कमी उपस्थितीमुळे प्रीलिमला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही, असा इशारा त्याला तीन वेळा दिला होता, त्यामुळे गेले चार दिवस तो शाळेत आला नव्हता, असंही पोलिसांनी सांगितलं.
बारावीतील विद्यार्थ्याकडून मुख्याध्यापिकेची गोळ्या झाडून हत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Jan 2018 10:35 AM (IST)
वर्गात वारंवार अनुपस्थिती आणि सुमार कामगिरीबद्दल मुख्याध्यापिका सर्व विद्यार्थ्यांसमोर त्याला शिक्षा करायच्या, असा आरोप विद्यार्थ्याने केल्याचं यमुनानगर पोलिसांनी सांगितलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -