नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयात नीट-यूजी परीक्षेच्या (UG NEET Exam) निकालावर सुनावणी होत असताना एक भलताच प्रकार घडल्याचं दिसून आलं. सरन्यायधीश डीवाय चंद्रचूड (DY Chandrachud) हे एका वकिलावर चांगलेच भडकले. त्यांनी सुरक्षा रक्षकांना बोलावून त्या वकिलाला बाहेर काढण्याची धमकीही दिली. त्यावर त्या वकिलानेही प्रत्युत्तर दिलं. तुम्ही माझा असा अपमान करू शकत नाही असं म्हणत त्या वकिलाने बायबलमधील प्रार्थनेतील काही ओळीही म्हणून दाखवल्या. सर्वोच्च न्यायालयात घडलेल्या या घटनेमुळे मात्र अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. 


सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्यासमोर नीट परीक्षेच्या निकालासंदर्भात सुनावणी सुरू होती. त्यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. नरेंद्र हुडा हे युक्तिवाद करत होते. त्यांच्या युक्तिवादावेळी कोर्टात हजर असलेले अॅड. मॅथ्यूज नेदुमपारा (Advocate Mathews Nedumpara) हे सातत्याने मध्ये बोलत होते. 


शांत बसण्याच्या सूचना, पण उलट उत्तर दिलं


अॅड. मॅथ्यूज नेदुमपारा यांच्या या कृतीमुळे सरन्यायाधीश भडकले. त्यांनी नेदुमपारा यांना शांत बसण्याच्या सूचना केल्या. पण आपण अॅमिकस म्हणजे कोर्टाचा मित्र म्हणून असल्याने बोलत आहोत असं नेदुमपारा म्हणाले. त्यावर आपण या प्रकरणात कुणालाही अॅमिकस म्हणून नियुक्त केलं नाही असं सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलं. त्यावर अॅड. मॅथ्यूज नेदुमपारा यांनी सरन्यायाधीशांना उलट उत्तर दिलं. तुम्ही जर माझा आदर करत नसाल तर मी निघून जातो असं ते म्हणाले. 


अॅड. मॅथ्यूज नेदुमपारा यांच्या या कृतीवर सरन्यायाधीश भडकले. ते म्हणाले की, तुम्ही शांत बसा. सुरक्षारक्षकांना बोलावून यांना तातडीने बाहेर काढा. 


सरन्यायाधीशांनी सुरक्षा रक्षकांना बोलावल्यानंतर अॅड. मॅथ्यूज नेदुमपारा म्हणाले की, मी स्वतः जातो. त्यावर सरन्यायाधीश पुन्हा म्हणाले की, मी गेल्या 24 वर्षांपासून न्यायप्रक्रियेत आहे. अशा प्रकारे कोर्टाच्या कामकाजात व्यत्यय आणल्यास मी खपवून घेणार नाही. त्यावर अॅड. मॅथ्यूज नेदुमपारा यांनीही प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले की, मीही या ठिकाणी 1979 पासून काम करतोय. तुम्ही अशा प्रकारे कुणाला बाहेर काढू शकत नाही असं म्हणत नेदुमपारा कोर्टाबाहेर गेले. 


थोड्या वेळाने अॅड. मॅथ्यूज नेदुमपारा पुन्हा कोर्टात आले आणि त्यांनी माफी मागितली. मी काही चुकी केली नाही, पण माझ्यावर अन्याय केला जातोय असं ते म्हणाले. अॅड. मॅथ्यूज नेदुमपारा यांनी यावेळी बायबलमधील एक ओळ सांगितली. 'आपला अपमान केला असला तरी सरन्यायाधीशांना माफ कर, कारण ते काय करतात हे त्यांना माहिती नाही' असं अॅड. मॅथ्यूज नेदुमपारा म्हणाले. 


सर्वोच्च न्यायालयात असं काही करण्याची अॅड. मॅथ्यूज नेदुमपारा यांची ही काही पहिली वेळ नाही. या आधीही अॅड. मॅथ्यूज नेदुमपारा यांनी अशा प्रकारचा वाद घातला आहे. इलेक्टोरल बाँड्स प्रकरणाच्या सुनावणीवेळीही त्यांनी अशाच प्रकारे कोर्टामध्ये युक्तिवादामध्ये व्यत्यय आणला होता. त्यावेळीही सरन्यायाधीशांनी त्यांना चांगलंच सुनावलं होतं. 


ही बातमी वाचा: