मुंबई : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. अशातच मे महिन्यात होणाऱ्या आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी  केली जात होती. अखेर आज आयसीएसई बोर्डाच्या परीक्षांसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयसीएसई दहावी बारावी बोर्ड परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 4 मे पासून घेण्यात येणाऱ्या आयसीएसई दहावी बारावी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून जूनच्या पहिल्या आठवड्यात परिस्थिती पाहून परीक्षा बाबत निर्णय घेतला जाईल.


आयसीएसई दहावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन ऑप्शन (पर्याय) देण्यात आले असून एकतर दहावी बोर्ड परीक्षा देणारे विद्यार्थी ऑफलाइन लेखी परीक्षा देऊ शकतात किंवा लेखी परीक्षा न देता क्रयटेरिया नुसार त्याचा निकाल जाहीर केला जाईल.


दहावी, बारावीची परीक्षा पुढे ढकलली


दरम्यान याआधी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यातील संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीचे वेळापत्रक बदलण्याबाबत निर्णय झाला. आता दहावीची परीक्षा जून महिन्यात आणि बारावीची परीक्षा मे अखेरीस घेण्यात येणार आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहून लवकरच नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली


कोरोनाच्या पारश्वभूमीवर  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं (सीबीएसई) दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर 4 मे पासून सुरु होणारी सीबीएसईची बारावीची परीक्षा लांबणीवर ढकलण्यात आली आहे. दरम्यान, बारावीच्या परीक्षेबाबत एक जूनला फेरआढावा बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर किमान 15 दिवस आधी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे.


मेडिकलची परीक्षा पुढे ढकलली


महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या 19 एप्रिलपासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्या माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने 15 दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मेडिकलची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षा आता येत्या जून महिन्यात घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल.