बेळगाव : बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी संपली असून महाराष्ट्र एकीकरण समिती, भाजप आणि काँग्रेस पक्षाने अनेक दिग्गजांना प्रचारात सहभागी करून मतदारसंघ पिंजून काढला. बेळगाव लोकसभा मतदार संघातून चार वेळा निवडून येवून केंद्रात रेल्वे राज्य मंत्रिपद भूषवलेले सुरेश अंगडी यांच्या अकाली निधनामुळे बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक 17 एप्रिल रोजी होणार आहे. 


भाजपमध्ये अनेक जण निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याने भाजपने अखेर दिवंगत रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी यांना उमेदवारी घोषित केली. काँग्रेसने देखील आमदार सतीश जारकीहोळी यांना पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरवले. महाराष्ट्र एकीकरण समितीने तरुण उमेदवार शुभम शेळके यांना उमेदवारी देवून पोटनिवडणुकीत राष्ट्रीय पक्षासमोर आव्हान उभे केले. पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मराठी भाषिक एकत्र आले आणि त्यांनी प्रचाराचा झंझावात सुरू केला.


शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रॅली काढून आणि जाहीर सभा घेवून मराठी भाषिकांमध्येत चैतन्याचे वातावरण निर्माण केले. समिती उमेदवार शुभम शेळके यांना जनतेने लोकवर्गणी काढून प्रचाराला मदत केली. हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी देखील समितीच्या उमेदवारासाठी झंझावाती प्रचार केला. भाजप हायकमांडने तर ही लोकसभा पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनवून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी ,मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,कर्नाटकचे अर्धे मंत्रिमंडळ प्रचारात गुंतवले होते.


मतदारसंघातील विधानसभा क्षेत्रात सहा भाजप आमदार असल्याने त्यांनीही आपापल्या भागात प्रचाराचा धडाका लावला होता.मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा  यांनी तर अंगात ताप असताना देखील अनेक प्रचार सभा, रोड शो करून भाजप उमेदवार मंगला अंगडी यांचा प्रचार केला. सीमाभागातील मराठी भाषिकांना आपल्याकडे वळवण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर सभा घ्यायला लावली होती. त्यानंतर दुसरे दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी बेळगावात पत्रकार परिषद घेवून फडणवीस यांच्यावर टीका केली.


काँग्रेस आमदार सतीश जारकीहोळी यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी मतदारसंघात प्रचार सभा, रॅली काढून भाजपसमोर आव्हान उभा करण्याचा प्रयत्न केला. दलित,अल्पसंख्यांक आणि परंपरागत मतदारांवर काँग्रेसची भिस्त आहे. भाजपची भिस्त लिंगायत आणि मराठी मतांवर आहे. तर शुभम शेळके या तरुण उमेदवाराने प्रचार मोहीम जोरदार राबवून राष्ट्रीय पक्षांसमोर आव्हान उभे केले आहे.