Prithviraj Chavan : गेल्या 24 वर्षांपासून पक्षात निवडणुका होत नाहीत, ही लोकशाहीच्या दृष्टीने चांगली गोष्ट नसल्याचे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केले आहे. नियुक्त केलेले लोक नेतृत्वाला गंभीर सल्ले देऊ शकत नाहीत, असे म्हणत चव्हाण यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याभोवती जमलेल्या कोंडाळीवर हल्लाबोल केला. पक्षात पूर्णवेळ जबाबदारी घ्यायला कोणी तरी पुढे यायला पाहिजे. राहुल गांधी येणार नसतील तर अजून काहीतरी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे हे आमचं म्हणणं असल्याचे चव्हाण म्हणाले.
पूर्णवेळ जबाबदारी घ्यायला कोणी तरी पुढे यायला पाहिजे
यावेळी चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत कारभाराकडे देखील बोट केलं आहे.काँग्रेसचे चिंतन शिबिर हे मुळात जी-23 गटाने उपस्थित केलेल्या मुद्दयांमधून निर्माण झाले आहे. पक्षात पूर्णवेळ जबाबदारी घ्यायला कोणी तरी पुढे यायला पाहिजे. राहुल गांधी येणार नसतील तर अजून काहीतरी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे हे आमचं म्हणणं असल्याचे चव्हाण म्हणाले. गेली चोवीस वर्ष पक्षातल्या अनेक पदांवर निवडणुका झालेल्या नाहीत. नियुक्त्या केलेल्या लोकांकडून गंभीर सल्ले येण्याची शक्यता नसते. वर्किंग कमिटी 60-70 लोकांची झाली आहे. इतक्या मोठ्या कमिटीत नीट चर्चा होऊ शकत नसल्याचे चव्हाण म्हणाले. कॉंग्रेसने निवडणुका स्वतःच्या बळावर लढवाव्यात की मित्र पक्षांसोबत याबद्दल पक्षात दोन मतप्रवाह आहेत. सोनिया गांधींच्या नेतृत्वात ही सगळी पुढची प्रक्रिया आता नीट पार पाडली जावी अशी आमची आशा असल्याचे चव्हाण यावेळी म्हणाले.
भाजप कधी नट्यांना तर कधी राज ठाकरेंना पुढे आणते
भाजपचा उघड ध्रुवीकरण करण्याचा जो प्रयत्न चालला आहे, त्याला कसं उत्तर द्यायचं यावर चिंतन शिबिरात चर्चा झाल्याचे चव्हाण यावेळी म्हणाले. भाजप स्वतः पुढे न येता कधी नट्यांना, तर कधी राज ठाकरेंना पुढे करते. भाजपकडून लोकांना चिथावण्याचे प्रयत्न चालू आहेत. ही भाजपची रणनिती असल्याचे चव्हाण यावेळी म्हणाले. कायद्याचा धाक दाखवून अशा लोकांना सरळ केले पाहिजे असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: