नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण खर्चाबाबत नेहमीच टोमणे मारणाऱ्या चीनने यंदाच्या वर्षी आपल्या संरक्षण खर्चात प्रचंड प्रमाणात वाढ करण्याची तयारी सुरु केली आहे. 2018 साठी चीनने संरक्षण खर्चात तब्बल 175 अब्ज डॉलर्सची वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे चीनचा एकूण संरक्षण खर्च जवळजवळ 11 हजार 380 अब्ज रुपये झाला आहे.


भारताच्या संरक्षण खर्चाच्या तुलनेत चीनचा खर्च जवळपास चौपट झाला आहे. दरवर्ष भारत 2 लाख 95 हजार कोटींचा खर्च संरक्षणावर करतो. चीनच्या खर्चात झालेली वाढ ती थोडीथोडकी नाही, तर 8.1 असल्याचं सांगितलं जातं आहे.

चीनचा वाढता संरक्षण खर्च भारताची चिंता तर वाढवणारा आहेच. पण अमेरिका आणि दोस्त राष्ट्रांनाही विचार करायला लावणारा आहे. जगभरातले आपले नौदलाचे तळ मजबूत करणं, नव्या ठिकाणी हवाई अड्डे तयार करणे, सैन्याचं आधुनिकीकरण आणि भविष्यातल्या  शस्त्रांचं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी सर्वाधिक रक्कम खर्च केली जाणार आहे.

संरक्षण क्षेत्रावर खर्च करणाऱ्या जगातल्या टॉप-10 देशांमध्ये आता चीन दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. जगभरात होणाऱ्या संरक्षण खर्चाच्या 13 टक्के खर्च चीन करतो. सर्वाधिक खर्चात अर्थातच अमेरिका आहे. एकूण खर्चाच्या 36 टक्के रक्कम अमेरिका संरक्षण क्षेत्रावर करते.

रशियाचा खर्च 4.1 तर सौदी अरेबियाचा खर्च 3.9 टक्के आहे. भारताचा क्रमांक या यादीत फ्रान्सच्या बरोबरीने पाचवा लागतो. भारत आणि फ्रान्स 3.3 टक्के खर्च संरक्षणावर करतात. इंग्लंड, जपान आणि जर्मनीचा संरक्षण खर्च अनुक्रमे 2.9, 2.7 आणि 2.4 टक्के आहे. दक्षिण कोरीया आणि इटली या यादीत शेवटच्या क्रमांकावर आहे.