India China Tension : चीनकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (LAC) मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भागात आपला दावा अधिक मजबूत करण्यासाठी गावं वसवली जात आहेत. आता चीनकडून भारताला (India China Tension) असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ आता महामार्ग बांधणार आहे. चीन बांधत असलेला महामार्ग हा भारताच्या सीमारेषा भाग मार्गे जिंगजँग आणि तिबेटला जोडला जाणार आहे. या महामार्गामुळे चीनची सामरिक स्थिती आणखी मजबूत होणार आहे. लष्कराच्या हालचालीसाठी हा महामार्ग फायदेशीर ठरणार आहे.
'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार, तिबेटच्या ल्हुंज काउंटीमधून शिंजियांग क्षेत्रातील काश्गर येथे जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग हा चीन सरकारने जाहीर केलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमातंर्गत जाहीर करण्यात आलेल्या 345 नवीन प्रकल्पांपैकी एक आहे. या योजनेनुसार, 2035 पर्यंत एकूण 4 लाख 61 किमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात येणार आहे. पायाभूत सुविधांमध्ये वाढ करून चीन आपल्या अर्थव्यवस्थेत प्राण फुंकण्याचे प्रयत्न करत आहे.
ल्हुंज काउंटी भाग हा अरुणाचल प्रदेशजवळ आहे. चीनकडून अरुणाचल प्रदेशवर दावा करण्यात येतो. अरुणाचल प्रदेश हा तिबेटचाच भाग असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येतो. जी695 या नावाने ओळखला जाणारा महामार्ग हा कोना काउंटी भागातून जाण्याची शक्यता आहे. हा भाग प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या उत्तर भागात आहे. काम्बा काउंटी भागाची सीमा सिक्कीमला जोडली गेली आहे. गयीरोंग काउंटी नेपाळच्या सीमालगत भागात आहे. तर, गयीरोंग काउंटी भाग गयीरोंग काउंटी नेपाळच्या सीमा भागात आहे. चीनकडून बांधण्यात येणाऱ्या नव्या राष्ट्रीय महामार्गाचा काही भाग हा भारताच्या भूभागातून जाणार आहे. यामध्ये डेपसांग मैदानी प्रदेश, गलवान खोरे आणि हॉट स्प्रिंगसारख्या भागातून जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
डोकलामजवळ गावं वसवली
एका बाजूला भारतासोबत लडाखमधील सीमा प्रश्नावर चर्चा सुरू असताना दुसरीकडे चीनची विस्तारवादी भूमिका (India China Tension) कायम असल्याचे समोर आले आहे. भारतासाठी रणनीतिकदृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या 'चिकन नेक' जवळ चीनने आगळीक केली आहे. भूटानच्या बाजूने असलेल्या डोकलामजवळ (Doklam) चीनने एक गाव वसवले असल्याचे संकेत देणारे सॅटेलाइट फोटो समोर आले आहेत. हे फोटो मेक्सर कंपनीने घेतले आहे. मेक्सर कंपनी अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत आहे.