नवी दिल्ली: स्वातंत्र्यदिनाच्या जल्लोषाला काल नवी दिल्लीत गालबोट लागलं. पतंगाच्या मांजामुळं एका दिवसात तिघांचा मृत्यू झाला असून, यामध्ये एका 3 वर्षाच्या चिमुकलीचा ही समावेश आहे.

 

दिल्लीतील राणीबाग परिसरातून तीन वर्षाची सांची गोयल आपल्या आई-वडिलांसोबत गाडीतून प्रवास करत होती. यावेळी सांची गाडीच्या रुफ विंडोतून बाहेर डोकावून प्रवासाचा आनंद घेत होती. याचदरम्यान पतंगाच्या मांजाने तिचा गळा कपला. सुरुवातीला तिच्या आई-वडिलांना याचा अंदाज आला नाही. मात्र, नंतर साक्षी रक्ताळलेली पाहून घाबरलेल्या तिच्या पालकांनी तिला घेऊन तत्काळ रुग्णालयात धाव घेतली. मात्र, तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 

तर दुसऱ्या एका घटनेत 19 वर्षाच्या जफर सैफचा पतंगाच्या मांजामुळे मृत्यू झाला. जफर 15 ऑगस्ट दुपारी 4 च्या दरम्यान द्वारकाहून आपल्या बाईकवरून निघाला होता. विकासपुरीच्या उड्डाणपूलावर पतंगाच्या मांजाने जफरचाही गळा कापल्याने त्याचा मृत्यू झाला. आणखी एका घटनेत रोहित नावाचा मुलगा विजेच्या  खांबावर लटकेला पतंग काढण्यास गेला असता, विजेच्या तीव्र झटक्याने त्याचाही मृत्यू झाला.

 

दरम्यान, या घटनांनंतर दिल्ली सरकारच्या वतीने अध्यादेश काढून चयनीज, नायलॉन आणि प्लास्टिकच्या मांजावर बंदी घातली आहे. तसेच पतंग उडवण्यासाठी कापसाच्या दोराचाच वापर करण्याचे आदेश दिले आहेत.