Rahul Gandhi on China : चीनकडून सातत्याने नव-नवीन कुरापती सुरूच आहेत. पूर्व लडाखमधील पॅंगॉन्ग त्सो तलावाभोवती चीन दुसरा मोठा पूल बांधत असल्याचं समोर आलंय. चीनच्या या वाढत्या विस्ताराबाबत आता कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्राला सल्ला दिला आहे. चीनचा मुकाबला करण्यासाठी पर्यायी जागतिक दृष्टीकोन तयार करण्यात मदत करण्याची भारताकडे धोरणात्मक संधी आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 


राहुल गांधी यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून त्यांनी चिनच्या वाढत्या विस्ताराच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्तित केले आहेत. "सध्या जगात दोन प्रकारचे दृष्टीकोन कार्यरत आहेत. चीनचा दृष्टिकोन वेगळा आहे, तर अमेरिकेचा दृष्टिकोन वेगळा आहे. पायाभूत सुविधा, 5G सारख्या सुविधा देऊन चीन आपल्या शेजारी देशांना आकर्षित करत आहे, असे  राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 




राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, चीनचे विस्तारवादी धोरण थांबले पाहिजे, असे अमेरिकेसारख्या देशांचे मत आहे. माझा प्रश्न आहे की आपण यासाठी काय ऑफर करत आहात. आपण अमेरिकेबद्दल बोलतो त्यावेळी फक्त संरक्षणाबाबत बोलतो. परंतु, लोक समृद्ध करण्याच्या मुद्द्यांवरही बोलले पाहिजे.


चीनचे धोरण भारताच्या हिताचे नाही


"चीनचा विस्तारवाद भारताच्या हिताचा नाही. चीन आणि अमेरिका या दोघांची रणनीती वेगळी आहे. अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांसोबतचे आमचे संबंध संरक्षणाच्या पलीकडे जाऊन संयुक्तपणे समृद्धी निर्माण करणाऱ्या आर्थिक करारांकडे वळले पाहिजेत. चीनचा मुकाबला करण्यासाठी पर्यायी जागतिक दृष्टीकोन तयार करण्यात मदत करण्याची भारताकडे धोरणात्मक संधी आहे, असे राहुल गांधी म्हणाले.