शांघाय: चीनमध्ये पुन्हा एकदा उद्रेक होत असल्याच्या बातम्या येत आहेत. जगभरातल्या माध्यमांमधून येत असलेल्या या बातम्यांमुळे भारतातही चिंता व्यक्त केली जात आहे. पुन्हा एकदा आपण दोन वर्षापूर्वीच्या स्थितीकडे परत जातोय की काय अशीही चर्चा होताना दिसतेय. पण चीनमधील जे काही चित्र आपल्यासमोर उभं केलं जात आहे ते वास्तविक नाही, चीनमध्ये तशी काहीच गंभीर आणि काळजीची परिस्थिती नाही असं डॉ. अचल श्रीखंडे यांनी एबीपी माझाला सांगितलं. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. डॉ. अचल श्रीखंडे हे सध्या चीनमधील शांघाय येथे आहेत. 


कोविड हा आपल्यासोबत राहणारच आहे, तो पूर्णता नष्ट होणार नाही. कोविड आता संसर्गजन्य रोग बनला असून तो सगळ्यांनाच होईल. सध्या चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. पण त्याची काही काळजी करण्यासारखं नाही असं डॉ. अचल श्रीखंडे यांनी म्हटंलं. 


China Corona Live Updates : गंभीर आणि चिंताजनक परिस्थिती नाही 


डॉ. अचल श्रीखंडे चीनमधील वास्तविक परिस्थितीची माहिती देताना म्हणाले की, "चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे हे खरं आहे. परंतु त्यामुळे चिंताजनक स्थिती कुठेही नाही. आम्ही डॉक्टर खुश आहोत. आम्हाला किमान कोरोनाचे रुग्ण तपासता येत आहे. लोक खूष आहेत. त्यांना सततची सक्ती होती ती दूर झाली आहे. जगभरात दाखवण्यात येतंय तशी काही परिस्थिती चीनमध्ये नाही. चीनमध्ये पसरणारा व्हेरियंट हा ओमिक्रॉन आहे. तो वेगाने पसरतो आहे, परंतु अतिशय माईल्ड आहे. तीन दिवसांच्या उपचारानंतर सर्व वयोगटातील लोक बरे होत आहेत. केवळ दोन गोळ्या आम्ही देत आहोत." 


China Corona : ऑक्सिजनची कमतरता नाही, हॉस्पिटल भरलेली नाहीत


शांघायचा विचार करायचं झालं तर बहुसंख्य रुग्ण हे असिमटॅमीक आहेत असं डॉ. अचल श्रीखंडे म्हणाले. ते म्हणाले की, "चीनमध्ये भारतीय वंशाचे डॉक्टर किंवा मराठी बोलणारे मंडळीपैकी कुणीही भयंकर स्थिती असल्याचं मला सांगितलं नाही. मी ज्या अंतरराष्ट्रीय रुग्णालयांमध्ये काम करतो तिथेही अशी स्थिती नाही. रूग्णालयं रुग्णांनी भरली नाहीत. या ठिकाणी ॲाक्सिजनचीही कमतरता नाही. लोकांना व्हेंटिलेशनवर जाण्याची गरज पडत नाही. मृत्यूदर हा अत्यंत कमी असून तो केवळ 60 वर्षानंतरच्या काही रुग्णांमध्ये आढळतो." 


China Covid Deaths : चीनमध्ये लोक रस्त्यांवर मोकळे फिरतायत, आनंद घेतायत 


जगभरात दाखवलं जातंय तशी परिस्थिती चीनमध्ये आजिबात नसल्याचं सांगत डॉ. अखंड अचल म्हणाले की, चीनमधील क्वारंटाईन सेंटर्स बंद करण्यात आली आहेत. ज्यांना कोरोनाची लक्षणं आहेत त्यांना सात दिवसांसाठी घरातच रहावं लागतं. झीरो कोविड पॉलिसी मागे घेतल्याने लोक रस्त्यांवर मोकळे फिरत आहेत, मॉल्समध्ये जात आहेत आणि आनंद घेत आहेत. कोणीही कशाही पद्धतीच्या चिंतेमध्ये नाहीत. 


China Coronavirus: चीनमध्ये रुग्णांचं लक्षणं काय आहेत?


डोकं दुखणं, नंतर ताप येणं ही सर्वसामान्य लक्षणं चीनमधील लोकांमध्ये असल्याचं डॉ. अचल श्रीखंडे यांनी सांगितलं. मग त्यावर पॅरासिटॉमल देणं हाच उपचार करण्यात येतोय. तीन दिवसांपर्यंत लोक बरं होतात. सातव्या दिवशी पुन्हा कोरोना चाचणी केली जाते आणि तो व्यक्ती कामावर परतू शकतो अशी माहिती त्यांनी दिली. 


देशातील दोन स्वदेशी कोरोना लसींना प्राधान्य दिले जात आहेत, त्याचा बुस्टर डोसही देण्यात आला आहे अशी माहिती डॉ. अचल श्रीखंडे यांनी दिली. 


India Coronavirus: भारतीयांना आजिबात चिंता व्यक्त करु नये


चीनमध्ये असलेला व्हेरियंट हा ओमिक्रॉन असल्याची माहिती डॉ. अचल श्रीखंडे यांनी दिली. त्याच्या तुलनेत अधिक प्रभावी असलेल्या डेल्टा व्हेरियंटमधून भारतीय नागरिक गेले आहेत. त्यामुळे कोरोनाबद्दल चिंता करण्याचं कारण नसल्याचं ते म्हणाले. डॉ. अचल श्रीखंडे म्हणाले की, कोविडमुळे चीनमध्ये मृत्यूचं थैमान सुरू आहे अशा आशयाच्या बातम्या चुकीच्या आहेत. भारतीयांनीही त्याची काळजी करण्याची गरज नाही. 


 ना सरकारी कार्यालय बंद, ना बाजार बंद


आम्ही सगळे डॉक्टर्स यासाठी तयार होतो, रुग्णालय तयार होती. हा नॉर्मल फ्लू आहे. रुग्णाला व्हेंटिलेशनची गरज पडत नाही. त्यामुळे आम्ही याला अतिशय नॉर्मली ट्रीट करत आहोत. एक ते दोन दिवसांमध्ये रुग्ण घरी परत जातो आहे. बहुसंख्य रुग्ण तर रुग्णालयात येतच नाहीत. त्यांना कंपल्सरी सात दिवस घरी थांबायचे आहे. कुठेही काहीही बंद करण्यात आलेलं नाही. ना शाळा बंद आहेत, ना सरकारी कार्यालय बंद आहेत, ना बाजार बंद आहे.