नवी दिल्ली : जगभरातील देशांना विविध वस्तूंची निर्यात करणारा चीन सध्या धान्य संकटाचा सामना करत आहे. सुमारे तीन दशकात चीनने प्रथमच भारताकडून तांदळाची आयात करण्यास सुरवात केली आहे. भारतीय उद्योग अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेच्या रॉयटर्सला सांगितले की अन्नधान्य पुरवठा कमी झाल्यानंतर आणि भारतकडून किंमतीची सूट दिल्यानंतर चीन भारताकडून धान्य खरेदी करत आहे.
भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यात करणारा देश आहे तर चीन सर्वात मोठा आयातदार आहे. बीजिंग दरवर्षी सुमारे 40 लाख टन तांदूळ आयात करतो. पण, गुणवत्तेचं कारण देत तो भारतकडून खरेदी करणे टाळत होता. अशा परिस्थितीत सीमेच्या वादामुळे दोन्ही देशांमधील पूर्व लडाखमधील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण स्थितीत असताना चीनने भारताकडून तांदूळ खरेदी करण्याचा हा निर्णय घेतला आहे.
तांदूळ निर्यात असोसिएशनचे अध्यक्ष बी.व्ही. कृष्णा राव म्हणाले, की “पहिल्यांदाच चीनने तांदूळ खरेदी केली आहे. भारतीय धान्यांची गुणवत्ता पाहून चीन पुढच्या वर्षी अधिक धान्य खरेदी करण्याची शक्यता आहे.” उद्योग अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय व्यापाऱ्यांनी डिसेंबर-फेब्रुवारीमध्ये 1 लाख टन तांदूळ प्रतिटन तीन हजारांच्या दराने निर्यात करण्याचा करार केला आहे.
भारतीय व्यापार अधिकाऱ्याच्या मते, थायलंड, व्हिएतनाम, म्यानमार आणि पाकिस्तान यासारख्या चीनच्या पारंपरिक तांदूळ पुरवठा करणाऱ्या देशांकडे निर्यातीसाठी मर्यादित प्रमाणात धान्य आहे. भारताने ठरवलेल्या किंमतीपेक्षा 30 डॉलर जादा मागणी केली आहे.