नवी दिल्ली : केंद्राच्या तीन नवीन कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांजं दिल्लीत जोरदार आंदोलन सुरु आहे. दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी जमले आहेत. दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना आंदोलनाचा मार्ग सोडून चर्चेतून तोडगा काढण्याची विनंती केली आहे. तोमर यांनी म्हटलं की, दिल्लीच्या लोकांनी संयम दाखवावा. तुम्हाला त्रास होत असल्याचेही सरकारला समजत आहे. शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग सोडून चर्चेतून तोडगा काढावा, अशी विनंती त्यांनी शेतकऱ्यांना केली आहे. शेतकरी नेत्यांसोबत चर्चा सुरू असून उद्याही शेतकरी नेत्यांसमवेत बैठक आहे. आंदोलनावर लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
याआधी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारने कृषी संबंधीत तीन कायदे रद्द करावे, असे स्पष्टपणे सांगितले. शेतकरी नेते दर्शन सिंह म्हणाले की, तीनही कृषी कायदे रद्द करेपर्यंत आम्ही आमचे आंदोलन सुरू ठेवणार आहोत. तर शेतकरी नेते गुरनामसिंग चधूनी म्हणाले की, सरकारने जर आमच्या मागण्या मान्य न केल्या तर आम्ही आणखी तीव्र पावले उचलू. जर सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतले नाहीत तर आम्ही दिल्लीचे आणखी रस्ते रोखू, असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे.
संसदेचे विशेष अधिवेशन बोलवून कृषी कायदा रद्द करावा
केंद्र सरकारशी बोलण्यासाठी शेतकर्यांची एक छोटी समिती तयार केली जाणार नाही. आम्ही सरकारला सात-दहा पानांचा मसुदा पाठवू, जर सरकार सहमत झालं नाही तर शेतकरी आंदोलन सुरूच राहिल. संसदेचे विशेष अधिवेशन बोलवून कृषी कायदा रद्द करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. जर केंद्राने लवकरच आमचे म्हणणे न ऐकल्यास शेतकरी कठोर पावले उचलू शकतात. जर बंडखोरीसारखी परिस्थिती उद्भवू नये यासाठी सरकारने लवकरच शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या.