गोंदिया/वर्धा : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले मंगेश बालपांडे यांचं पार्थिव भंडारातील तुमसर इथल्या त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आलं आहे. दुपारी शहीद मंगेश बालपांडेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


शहीद मंगेश बालपांडे हे 2002 मध्ये सीआरपीएफमध्ये दाखल झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 10 वर्षाचा मुलगा आणि 4 वर्षांची मुलगी असा परिवार आहे.

सुकमातल्या नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेले वर्धा जिल्ह्यातील प्रेमराज मेंढे यांच्या पार्थिवावर सोनोरा गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढत प्रेमराज सीआरपीएफमध्ये भरती झाले होते. गेल्या 18 वर्षांपासून ते सीआरपीएफमध्ये कार्यरत होते. दोनच वर्षांपूर्वी त्यांची छत्तीसगडमध्ये बदली झाली होती.

नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय रखीव पोलीस दलाचे 12 जवान शहीद झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातल्या 3 जवानांचा समावेश आहे.