जशपुर : छत्तीसगड राज्यातील जशपूरमध्ये एक मोठी आणि दुःखद घटना घडली आहे. रस्त्यावर निघालेल्या धार्मिक रॅलीमध्ये सहभागी असलेल्या लोकांना एका कारने चिरडले. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून 10 पेक्षा जास्त लोक जखमी आहेत. या घटनेनंतर येथील परिस्थिती अनियंत्रित झाली आहे. लोक खूप संतापले आहेत, त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण आहे. संतप्त लोकांनी त्या गाडीला आग लावली. पोलिसांनी कार चालकासह दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
बबलू विश्वकर्मा पुत्र राधेश्याम विश्वकर्मा वय 21 वर्षे असे एका आरोपीचे नाव असून तो बधान, सिंगरौली, मध्य प्रदेशचा रहिवासी आहे. तर दुसऱ्या आरोपीचे नाव शिशुपाल साहू पुत्र रामजन्मा साहू आहे. याचे वय 26 वर्षे असून तो मध्य प्रदेशातील बाबरगव्हाण जिल्ह्यातील सिंगरौली जिल्ह्यातील रहिवासी आहेत. दोन्ही आरोपी मध्य प्रदेशचे रहिवासी असून ते छत्तीसगडमधून जात होते. दोन्ही आरोपींवर कारवाई सुरू आहे.
संतप्त लोकांनी पोलीस ठाण्यात घेराव घातल्याची माहिती मिळत आहे. लोक ठाण्याच्या बाहेर घोषणाबाजी करत आहेहेत. सर्व उच्च पोलीस अधिकारी घटनास्थळी घटनास्थळी पोहोचले आहेत. संतप्त लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
अपघात कसा झाला?
छत्तीसगडमधील जशपूरमध्ये 100-150 लोक दुर्गा मातेला विसर्जनासाठी घेऊन जात होते. उत्सवाचे वातावरण होते. अचानक मागून लाल रंगाची एक हाय स्पीड गाडी घटनास्थळी आली आणि लोकांना चिरडून पुढे गेली. इतकी लोकं रस्त्यावर असताना चालकाने गाडी का थांबवली नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, वाहनात भरपूर अंमली (गांजा) पदार्थ असल्याची माहिती आहे. जर ड्रायव्हरने गाडी थांबवली असती तर तो पकडला गेला असता.
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते रमण सिंह यांनी राज्यातील काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला आहे. या अपघाताची जबाबदारी घेत राज्याच्या गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.