नवी दिल्ली : ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमारविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. अखेर सुशील कुमारला अटक करण्यात आली आहे. माजी ज्युनियर नॅशनल चॅम्पियन सागर धनखडच्या मृत्यू प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप सुशील कुमारवर आहे. सुशील कुमारवर एक लाखांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं. सुशील कुमार परदेशात पसार झाला असावा असा संशय पोलिसांना होता. याच पार्श्वभूमीवर देशाच्या सर्व विमानतळांवर सुशील संदर्भात माहिती देण्यात आली होती. 


दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं ही कारवाई केली. सुशील आणि आरोपी अजयला दिल्लीतील मुंडका परिसरातून अटक करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "पोलीस निरीक्षक शिवकुमार, पोलीस निरीक्षक करमवीर आणि एसीपी अत्तर सिंह यांच्या नेतृत्त्वात स्पेशल सेलनं सुशील कुमार आणि अजयला दिल्लीतील मुंडका परिसरातून अटक केली."



देशाची राजधानी दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगमध्ये 4 मे रोजी पैलवानांमध्ये झालेल्या हाणामारीत माजी ज्युनियर नॅशनल चॅम्पियन सागर धनखडचा मृत्यू झाला होता. त्याच्या हत्येमध्ये सुशील कुमारचा सहभाग असल्याचा आरोप आहे. सागरच्या हत्येनंतर सुशील कुमार आपल्या साथीदारांसह उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये पळून गेल्याचं म्हटलं जात होतं. त्याचं अखेरचं मोबाईल लोकेशन हरिद्वारमध्ये सापडलं होतं. त्यानंतर मात्र त्याचा फोन बंद येत होता. तो नेपाळमध्ये पळाल्याचा संशय पोलिसांना होता. त्यामुळे नेपाळच्या सीमेवरही बंदोबस्त आणि चौकशी वाढवण्यात आली होती. अखेर सुशील कुमारला दिल्लीतून अटक करण्यात आली. 


मारहाणीचा व्हिडीओ पोलिसांच्या हाती


मारहाणीचा व्हिडीओही पोलिसांच्या हाती लागला आहे. ज्या दिवशी हत्या झाली, त्याच रात्री पोलिसांनी यामध्ये सहभागी असलेला एक आरोपी प्रिन्स दलालला अटक केली होती. त्याच्या चौकशीनंतर पोलिसांनी आणखी दहा आरोपींची ओळख पटवली होती. परंतु अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी या प्रकरणात सुशील कुमारचे सासरे आणि द्रोणाचर्च पुरस्कार विजेते सतपाल सिंह तसंच मेहुणार लव सहरावत यांची अनेक तास चौकशी केली होती. पोलिसांनी सुशील कुमारच्या सासऱ्यांकडे त्याच्या लपण्याच्या संभाव्य ठिकाणांबाबत विचारणा केली होती. परंतु त्यांच्याकडून कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. 


बहुतांश लोकांचा सुशील आणि त्याच्या साथीदारांविरोधात जबाब : पोलीस


वायव्य दिल्लीचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त डॉ. गुरइकबाल सिंह सिद्धू यांच्या सांगितलं की, "आम्ही सतपाल सिंह आणि लव सहरावत यांची मॉडेल टाऊन पोलीस स्टेशनमध्ये बोलावून चौकशी केली. आम्ही सुशील कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहोत. तपासात आम्हाला समजलं की स्टेडियमच्या पार्किंगमध्ये सुशील कुमार, अजय, प्रिन्स दलाल, सोनू महाल, सागर आणि अमित यांच्या कथितरित्या वाद झाला. पोलिसांना या मारहाणीचा व्हिडीओ देखील सापडला आहे. यामध्ये मारहाणीत सामील असलेले लोक दिसत आहेत. याशिवाय पोलिसांनी स्टेडियममध्ये काम करणाऱ्या डझनभर कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली आहे. यामध्ये बहुतांश लोकांनी सुशील कुमार आणि त्याच्या साथीदारांविरोधात जबाब दिला आहे."