गुवाहाटी : 'इंडियन आयडल ज्युनिअर' या सोनी टीव्हीवरील रिअॅलिटी शोमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली गायिका नाहिद आफरीनविरोधात फतवा काढण्यात आला आहे. आयएस दहशतवादाच्या विरुद्ध आपल्या गाण्याच्या माध्यमातून एल्गार काढणाऱ्या नाहिदविरोधात 46 आसामी मुल्लांनी फतवा काढला आहे.
2015 मधील 'इंडियन आयडल ज्युनिअर'च्या पर्वात उपविजेत्या ठरलेल्या 16 वर्षांच्या नाहिदने नुकतंच एका जाहीर कार्यक्रमात आयएस विरोधात सूर आळवले. याचीच प्रतिक्रिया म्हणून हा फतवा काढला आहे, याचा तपास पोलिस करत आहेत. मध्य आसाममधील होजाई आणि नागाव जिल्ह्यात फतव्याची पत्रकं काढण्यात आली आहेत.
काय आहे फतवा?
'25 मार्चला आसामच्या लंका भागातील 'उदाली सोनाई बिबी कॉलेज'मध्ये नाहिद ही गायिका शरियाच्या विरोधात गाणं गाणार आहे. मस्जिद, इदगाह, मदरसे आणि स्मशानभूमीने वेढलेल्या कॉलेजच्या या मैदानात शरिया-विरोधी म्युझिकल नाईट आयोजित करण्यात आली तर आपल्या भविष्यातील पिढ्यांच्या मनात अल्लाविषयी राग निर्माण होईल.' असं या फतव्यात म्हटलं आहे.
16 वर्षांची नाहिद आफरीन दहावीची विद्यार्थिनी असून आसामच्या बिश्वनाथ चरियाली भागात राहते. आपल्याविरोधात काढलेल्या फतव्यामुळे तिला प्रचंड मोठा धक्का बसला आहे. 'मी निशब्द झाली आहे. संगीत ही माझ्यासाठी देवाची देणगी आहे. त्यामुळे मी अशा धमक्यांना भीक घालणार नाही, त्याच्यापुढे झुकणार नाही. माझं गाणं कधीच सोडणार नाही.' असं नाहिद म्हणते.
कार्यक्रमाच्या आयोजकांनीही मैफल रद्द करण्यास नकार दिल्याचं नाहिदच्या आईने सांगितलं आहे. नाहिद आणि तिच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवण्याची हमी पोलिसांनी दिली आहे. 2016 मध्ये सोनाक्षी सिन्हाची भूमिका असलेल्या 'अकिरा' चित्रपटासाठी पार्श्वगायन करुन तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.