चेन्नई : चेन्नईतील सात वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी 23 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. 23 वर्षीय दशवंतने हसिनीवर बलात्कार करुन तिला जाळलं होतं. तामिळनाडूतील चेंगलपेट कोर्टाने अपहरण, हत्येसह पोक्सोअंतर्गत येणाऱ्या कलमांअंतर्गत दशवंतला दोषी ठरवलं होतं.


काय आहे प्रकरण?

सात वर्षांची हसिनी चेन्नईतील मुगलीवक्कममध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होती. 6 फेब्रुवारी 2017 रोजी ती बेपत्ता झाली. त्याच इमारतीत राहणाऱ्या दशवंतला चेन्नई पोलिसांनी अटक केली. कुत्र्यासोबत खेळण्याच्या आमिषाने नेऊन दशवंतने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि तिची हत्या केली.

90 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करण्यात पोलिस अपयशी ठरले. सप्टेंबर महिन्यात दशवंतला जामीन मिळाला. दशवंतला कोर्टात नेण्यास आठ महिन्यांचा कालावधी लोटला. ऑक्टोबर 2017 मध्ये अखेर चेंगलपेट कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली.

आरोपी दशवंतचे वडील विजयकुमार यांनी फेब्रुवारी 2018 पर्यंतचा वेळ मागून घेतला. आपल्याला ऑस्ट्रेलियाला जायचं असल्याचं कारण त्यांनी पुढे केलं होतं. मात्र या कालावधीत पुराव्यांशी छेडछाड होऊ शकते, असा संशय हसिनीच्या वडिलांनी व्यक्त केला.

सुनावणीच्या काळात दशवंतने हसिनीच्या धाकट्या भावाची हत्या करण्याची धमकी दिल्याचंही हसिनीचे वडील राजेश यांनी कोर्टाला सांगितलं.

आईची हत्या करुन दागिने लुटले

2 डिसेंबर 2017 रोजी या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं. दशवंतची आई राहत्या घरी रक्ताच्या थारोळ्यात सापडली. दशवंतने आईच्या हत्या करुन दागिन्यांसह पळ काढल्याचं समोर आलं. दागिन्यांची वाटणी त्याने तुरुंगातील सहकैदी डेव्हिड आणि जेम्ससोबत केली.

6 डिसेंबर रोजी पोलिसांनी दशवंतला मुंबईत अटक केली. त्याने शिताफीने पळ काढला, मात्र दुसऱ्याच दिवशी पुन्हा पोलिसांनी त्याला जेरबंद केलं.

दशवंतने आपल्या आईची हत्या केल्याची कबुली दिली. धक्कादायक म्हणजे, वडील जर कामावरुन उशिरा आले नसते, तर त्यांनाही संपवलं असतं, असा कबुलीजबाब त्याने दिला. त्यामुळे वडिलांनी त्याला दिलेला कायदेशीर पाठिंबा काढून घेतला.

आपल्या मुलावरील प्रेमापोटी त्याला जामीन मिळवून दिला, मात्र त्यानेच आपल्या पत्नीला संपवल्यामुळे पश्चातापाची भावना त्याच्या वडिलांनी बोलून दाखवली.