नवी दिल्ली : पुलवामा येथे गेल्या वर्षी सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यात वापरण्यात आलेले केमिकल अॅमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग साईटवरुन मागवलं असल्याचं समोर आलं आहे. पुलवामा हल्ल्यात इम्प्रोवाईज्ड एक्सप्लोझिव्ह डिवाईस (IED) बनवण्यासाठी ज्या केमिकलचा वापर केला गेला, ते केमिकल ऑनलाईन मागवलं होतं. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.


टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, वाईज उल इस्लाम आणि मोहम्मद अब्बास राथेड अशी दोन आरोपींची नावं आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या वाइज-उल-इस्लामने अॅमेझॉनवरुन आयईडी बनवण्यासाठीचं केमिकल मागवलं होतं.


एनआयएच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅमेझॉनवर केमिकल ऑर्डर केल्याचं वाईजने मान्य केलं आहे आणि त्या केमिकलपासूनच आयईडी बनवण्यात आलं होतं. याशिवाय बॅटरी आणि अन्य सामनाही वाईजने मागवलं होतं. यासाठी वाईजला जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्यांनी निर्देश दिले होते. अॅमेझॉनवरुन हे सर्व सामान मागवल्यानंतर वाईज याने हे सामान स्वत: जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना दिलं होतं. तर अब्बास गेल्या अनेक वर्षांपासून जैश-ए-मोहम्मदसाठी काम करत होता. जैश-ए-मोहम्मदचा आरोपी आणि आयईडी एक्सपर्ट मोहम्मद उमरला आपल्या घरी आसरा दिला होता. उमर एप्रिल-मे महिन्यात 2018 ला काश्मीरमध्ये आला होता.


वाईस श्रीनगरचा रहिवाशी आहे, तर अब्बास हा पुलवामाच्या हाकरीपोरा येथील रहिवाशी आहे. दोघांना शनिवारी एनआयएच्या विषेश न्यायालयात हजर केलं जाणार आहे. पुलवामा हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत 5 जणांना अटक झाली आहे. तीन दिवसांपूर्वी हाकरीपोरा येथून दोघांना अटक करण्यात आली होती. तारिक अहमद शाह आणि इन्शा जन अशी दोन्ही आरोपींची नावं आहे. जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना घरात आसरा दिल्याचा या दोघांवर आरोप आहे.


गेल्यावर्षी 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्याला निशाणा बनवण्यात आलं होतं. लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. तब्बल 200 किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर आदळली. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यात बसचा अक्षरश: चुराडा झाला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. ‘जैश’चा पुलवामा येथील दहशतवादी आदिल अहमद दार याने हा हल्ला घडवला. आदिल हा काकापोरा येथील रहिवासी होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटकांनी भरलेल्या ज्या गाडीने जवानांच्या बसला धडक दिली, ती गाडी आदिल चालवत होता.


संबधित बातम्या