नवी दिल्ली : केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू घोटाळ्यात अडचणीत येण्याची शक्यता आहे. रिजीजू यांनी तब्बल 450 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसनं केला आहे. रिजीजू यांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.
आपल्या पदाचा दुरुपयोग करुन अरुणाचल प्रदेशातील दोन हायड्रो पावर प्रोजेक्ट्समध्ये नातेवाईक ठेकेदाराला फायदा करुन दिल्याचा आरोप रिजीजू यांच्यावर करण्यात आला आहे. काँग्रेसनं एक ऑडियो क्लिप जारी केली आहे. या टेपमध्ये किरेन रिजीजू यांचे नातेवाईक गोबोई रिजीजू हे अधिकाऱ्याला पूर्ण पेमेन्टच्या मोबदल्यात प्रमोशन देण्याविषयी बोलत असल्याचा दावा केला जात आहे.
गोबोई हे पटेल इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीत सहकंत्राटदार आहेत. मात्र दोन धरणांच्या बांधकामात खोटी बिलं आणि इन्व्हॉईस सादर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
किरेन रिजीजू यांनी आपल्यावरील सर्व आरोप खो़डून काढले आहेत. गोबोई हे आपल्या गावचे असले तरी परिवारातील दूरचे सदस्य आहेत, असा बचाव त्यांनी केला आहे.
डिसेंबर 2015 मध्ये झालेल्या 29 मिनिटांच्या या कथित ऑडिओ क्लीपमध्ये गोबोई हे किरेन यांचा उल्लेख 'भैया' असा 17 वेळा करताना आढळले आहेत.