नवी दिल्ली : दिल्लीतल्या तक्ष इन हॉटेलमधून सव्वा तीन कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. आयकर विभाग आणि क्राईम ब्रांचनं मिळून दिल्लीत ही कारवाई केली आहे.


या प्रकरणी पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हा पैसा मुंबईतल्या हवाला ऑपरेटर्सचा असल्याची शक्यता आहे. दिल्लीतून ही रोकड मुंबईला येण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाच जणांनी हॉटेलच्या दोन रुम बूक केल्या होत्या.

आयकर विभागाने मंगळवारी रात्री उशिरा ही कारवाई केली. पाचही जणांची कसून चौकशी केली जात असून त्यांना पोलीस कोठडीतच ठेवलं जाणार आहे. तर 3 कोटी 25 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

पुण्यातील वाकडमध्ये 67 लाख

पुण्यातील वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका कारमधून 67 लाख रुपयाची रोकड मध्यरात्री पकडण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या नोटांपैकी 62 लाखांची रोकड 2000 रुपयांच्या, तर उर्वरित पाच लाख 100 रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात आहेत.

मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी कार पाहून पोलिसांना संशय आला. याबद्दल गाडीतील चौघांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली गेली. गाडीची तपासणी करताच त्यात रोकड आढळली.

पोलिसांनी ही रोकड आयकर विभागाकडे सुपूर्द करत प्रवीण जैन, चेतन रजपूत, साईनाथ नेटके, अमित दोषी या चौघांना ताब्यात घेतले आहे. ही रोकड कुणाची होती आणि कुठे नेली जात होती हे अद्याप अस्पष्ट आहे.

गोव्यात दोन ठिकाणी रोकडजप्ती

गोव्यातील वालपोई भागातून 68 लाखांची रोकड पकडण्यात आली आहे. सिंधुदुर्गमधील बांद्यातून ही रोकड आणली जात होती. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तर कलंगुटमधून 24 लाखांच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या आहे. आयकर विभागाने गोव्यात ही कारवाई केली.