India: आता देशात भारत आणि इंडिया (India) या वादाला तोंड फुटलं आहे. सध्याच्या सरकारमध्ये ज्या प्रकारे शहरांची नावं बदलली जात आहेत, त्यावरुन सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. आता देशाचं नावही 'इंडिया'वरुन भारत होणार का? याबद्दल चर्चा सुरू आहे. वास्तविक, सध्या दोन्ही नावं अधिकृतपणे वापरली जातात. देशाला इंग्रजीत इंडिया आणि हिंदीत भारत म्हटलं जातं. मात्र आता इंडिया असा उल्लेख न करता भारत असा उल्लेख करण्याचा आणि यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्याचा मोदी सरकारचा मानस असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. 


पण जर केंद्र सरकारनं इंडिया असा उल्लेख वगळून जर भारत असं नाव केलं आणि त्याची अधिकृत घोषणा करायचं ठरवलंच तर ते काही सोपं नाही. त्यासाठी मोठी प्रक्रिया असणार आहेच, पण त्यासोबतच त्यासाठी मोठा खर्चही करावा लागणार आहे. केंद्र सरकारने देशासाठी केवळ 'भारत' हे नाव घोषित केलं, तर त्याला किती खर्च येऊ शकतो याचा अंदाज तुम्हाला आहे का? याबद्दलच आज जाणून घेऊयात. पण त्याआधी एखाद्या शहराचं किंवा राज्याचं नाव बदलल्यास किती पैसे खर्च होतात? हे सविस्तर जाणून घेऊया... 


शहर किंवा राज्याचं नाव बदलण्यासाठी किती खर्च येतो?


पूर्वी भारतातील अनेक राज्यांमधील विविध शहरांची नावं बदलण्यात आली होती. यामध्ये उत्तर प्रदेशचं नाव अग्रस्थानी राहिलं आहे. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने अनेक शहरांची नावं बदलली. मात्र, अलाहाबादचं नाव प्रयागराज केल्याचीच सर्वाधिक चर्चा राहिली. आता जर एखाद्या शहराचं नाव बदलण्याच्या खर्चाबद्दल बोलायचं झालं, तर तो अंदाजे 200 ते 500 कोटींच्या घरात जातो. हेच जर एखाद्या राज्याचं नाव बदलण्यासाठी होणाऱ्या खर्चाबद्दल बोलायचं झालं, तर त्यासाठी 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च येतो.


देशाचं नाव बदलण्यासाठी किती पैसे होणार खर्च?


एखाद्या शहराचं किंवा राज्याचं नाव बदलण्यासाठी किमान 100 कोटी रुपयांचा खर्च येऊ शकतो, त्यामुळे देशाचं नाव बदलण्यासाठी त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त खर्च येईल हे सहाजिक आहे. आऊटलुकने याचा संशोधनात्मक उलगडा केला आहे. या अहवालात स्पष्टीकरण देताना, 2018 मध्ये स्वाझीलँड नावाच्या आफ्रिकन देशाने आपलं नाव बदलून इस्वातिनी केलं होतं, असं सांगितलं आहे. त्यावेळी या छोट्या देशाचं नाव बदलण्यासाठी सुमारे 60 दशलक्ष डॉलर्स खर्च झाले होते. ज्या मॉडेलच्या आधारे हा आकडा काढण्यात आला, त्या मॉडेलच्या आधारे जर आपल्या देशाचं नाव बदललं तर सुमारे 14 हजार कोटी रुपयांचा खर्च येईल.


देशाचं नाव आता इंडिया ऐवजी भारत होणार का?


मंगळवारी (5 सप्टेंबर) सकाळी देशाच्या राष्ट्रपतींनी त्यांच्या अधिकृत राजपत्रावर प्रथमच प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी 'प्रेसिडेंट ऑफ भारत' असा उल्लेख केला. त्यानंतर हा देशाच्या नामांतराचा घाट आहे का? अशी पहिली शंका काँग्रेसने उपस्थित केली. खरंतर देशाच्या घटनेच्या पहिल्या कलमात, ज्या वाक्यानं घटनेची सुरुवात होते, त्यात India that is Bharat... shall be union of states असं वाक्य आहे. म्हणजे इंडिया आणि भारत अशी दोन्ही नावं घटनेनंच मान्य केलेली आहेत. पण इंडियाऐवजी भारत असा उल्लेख व्हावा ही संघाची जुनी मागणी आहे. 


इंडिया ऐवजी भारत हा बदल ज्या वेळेला होतोय तो टायमिंगही इंटरेस्टिंग आहे. विरोधकांनी बंगळुरुमधल्या दुसऱ्या बैठकीत आपल्या आघाडीचं नाव 'इंडिया' निश्चित केलं. पण या नावाचा उल्लेख न करता 'घमंडिया आघाडी' असाच उल्लेख मोदी करत राहिले. विरोधकांनी त्यांच्या घोषणेत जुडेगा भारत, जीतेगा इंडिया... असे दोन्ही शब्द आणलेत. मात्र अजून इंडिया नावाचं काय होणार हे स्पष्ट नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


India Bharat : भारताला 'इंडिया' हे नाव कसं पडलं? भारताच्या प्राचीन सात नावांचा इतिहास काय आहे?