भारत : बुधवार 23 ऑगस्ट हा दिवस इतिहासामध्ये भारताच्या नावाने लिहिला गेला आहे. संपूर्ण देश ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आला आणि भारत चंद्रावर पोहचला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने (ISRO) चांद्रयान -3 (Chandrayan 3) चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (South Pole) सॉफ्ट लँडींग यशस्वीरित्या केले आहे.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करुन इस्रोच्या प्रमुखांना शुभेच्छा दिल्या आहेत. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी दक्षिण आफ्रिकेमधून इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांच्या फोनवरुन संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटलं की, 'तुमचं नावच सोमनाथ आहे. सोमनाथ हे नाव देखील चंद्राशी जोडलेले आहे. यावेळी तुमचं कुटुंब देखील खूप आनंदी असणार. तुम्हाला आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं खूप खूप अभिनंदन. मी लवकरच तुम्हा सर्वांना प्रत्यक्ष भेटेन.' 






पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चार दिवसांच्या परदेश दौऱ्यावर आहेत. दक्षिण आफ्रिकेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ब्रिक्स परिषदेसाठी ते सध्या जोहान्सबर्ग येथे आहे. यावेळी त्यांनी चांद्रयान - 3 चे लँडिंग झाल्यानंतर ऑनलाईन माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी या ऐतिहासिक क्षणाचे कौतुक करत इस्रोच्या शास्रज्ञांना शुभेच्छा देखील दिला. हा भारतासाठी एक नवा सुर्योदय असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटलं. 


ही अत्यंत अभिमानाची गोष्ट - पंतप्रधान मोदी 


चांद्रयान -3 चे यशस्वी लँडिंग झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांशी देखील संवाद साधला. ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचं म्हणत त्यांनी इस्रोच्या शास्रज्ञांचे यावेळी आभार मानले. पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'हा क्षण ऐतिहासिक आहे, हा क्षण अभूतपूर्व आहे, हा क्षण विकसित भारताचा शंखनाद आहे. जेव्हा आपण अशी कोणतही ऐतिहासिक घटना अनुभवतो तेव्हा आपलं जीवन सार्थ होतं. हा क्षण भारतासाठी नवी उर्जा, प्रेरणा आणि शक्ती देणार आहे.' 


भारताची महत्त्वकांक्षी मोहिम चांद्रयान -3 चं बुधवार 23 ऑगस्ट रोजी यशस्वी सॉफ्ट लँडींग झालं. त्यानंतर संपूर्ण भारतात एकच जल्लोष साजरा करण्यात आला. यानिमित्ताने संपूर्ण जग इस्रोच्या शास्रज्ञांचं कौतुक करत आहे. चंद्रावर पोहचणार भारत जरी चौथा देश ठरला असला तरीही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. 


हेही वाचा : 


चांद्रयान 3 च्या यशानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा राष्ट्रपती, पंतप्रधानांना संदेश; भारताचं तोंडभरुन कौतुक