Chandrayaan 3: भारताच्या मिशन चांद्रयान-3 ने (Chandrayaan 3) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरून इतिहास रचला आहे. विक्रम लँडर चंद्रावर उतरण्याच्या काही क्षण आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथून लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे सहभागी झाले होते. चांद्रयान-3 च्या भव्य यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील सर्व नेत्यांनी इस्रोचं तोंडभरून कौतुक केलं आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) मायदेशात परतताच 26 ऑगस्टला बंगळूरू येथे जाऊन इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते आहे. 

Continues below advertisement

पंतप्रधान मोदी घेणार इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट

चांद्रयान-3 मोहिमेच्या यशामुळे भारत हा चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील चौथा आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. पंतप्रधान मोदींनी दक्षिण आफ्रिकेतून चांद्रयान-3 चं लाईव्ह लँडिंग पाहिलं. इस्रोचं मिशन यशस्वी  होताच पंतप्रधान मोदींनी इस्रो प्रमुखांशी फोनवरुन संवाद साधला. यानंतर आता मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी 26 ऑगस्ट रोजी बंगळुरू येथे जाऊन इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेणार आहेत. 

पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चार दिवसांच्या परदेश दौऱ्यावर आहेत, 26 ऑगस्टला ते भारतात परतणार असल्याचं म्हटलं जात आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ब्रिक्स परिषदेसाठी ते सध्या जोहान्सबर्ग येथे आहे. यावेळी त्यांनी चांद्रयान - 3 चं लँडिंग झाल्यानंतर इस्रोशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी त्यांनी या ऐतिहासिक क्षणाचं कौतुक करत इस्रोच्या शास्रज्ञांना फोनवरुन शुभेच्छा देखील दिल्या. हा भारतासाठी एक नवा सुर्योदय असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटलं.

Continues below advertisement

मोदींनी इस्रोच्या प्रमुखांशी साधला फोनवरुन संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी दक्षिण आफ्रिकेमधून इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटलं की, "तुमचं नावच सोमनाथ आहे. सोमनाथ हे नावच मुळात चंद्राशी जोडलेलं आहे. या क्षणी तुमचं कुटुंब देखील खूप आनंदी असणार. तुमचं आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं खूप खूप अभिनंदन. मी लवकरच तुम्हा सर्वांना प्रत्यक्ष भेटेन."

ही अत्यंत अभिमानाची गोष्ट - पंतप्रधान मोदी

चांद्रयान -3 चं यशस्वी लँडिंग झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशवासियांशी देखील संवाद साधला. ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचं म्हणत त्यांनी इस्रोच्या शास्रज्ञांचे यावेळी आभार मानले. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, "हा क्षण ऐतिहासिक, अभूतपूर्व आहे, हा क्षण विकसित भारताचा शंखनाद आहे. जेव्हा आपण अशी कोणतीही ऐतिहासिक घटना अनुभवतो तेव्हा आपलं जीवन सार्थ होतं. हा क्षण भारतासाठी नवी उर्जा, प्रेरणा आणि शक्ती देणारा आहे." 

हेही वाचा:

ISRO Scientists Salary: इस्रोच्या वैज्ञानिकांना नेमका किती पगार मिळतो? जाणून घ्या